सोनसांगवी खूनातील आरोपी गजाआड

0

रांजणगाव । शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला शोधून काढण्यात रांजणगाव पोलिसांना यश आले आहे.

सोनेसांगवी हद्दीत एका 17 ते 18 वर्षे वयाच्या मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या ठिकाणी कपाळावर मार लागलेला, नाकातोंडातून रक्त येत असलेला आणि डावा पंजा जनावराने खाल्लेला अशा अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला. या तपासाअंती हा मृतदेह पंकज पोपट शेळके याचा असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी या मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदन केले. तसेच अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपास यंत्रणा कार्यन्वित केली. त्यानंतर गावातीलच एक मुलगा या तपास प्रक्रीयेत सहभागी होत नसल्याचे निष्पन्न होताच त्याला वाघाळे येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस खाकीचा बडगा उगारताच विशाल ऊर्फ महादू नंदु शेळके (वय 22) याने वैयक्तिक रागाच्या भरात हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, दौंड विभागाचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार मंगेश थिगळे, अजित भुजबळ, राजू मोमीन, तुषार पंधारे, विनायक मोहिते, चंद्रकांत काळे आदींचे सहकार्य लाभल्याचे पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.