जळगाव। गणपतीनगरात आलेल्या महिलेची 28 जानेवारी 2015 रोजी मोटार सायकलवरून आलेल्या तरूणांनी 8 ग्रँमची चेन हिसकावून चोरून नेली होती. यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हा खटला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात मंगळवारी न्या. पाटील यांनी दोन्ही सोनसाखळी चोरट्यांना तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
गणपतीनगरातून महिलेची लांबविली होती सोन्याची चेन
नाशिक येथील रहिवासी रजनी रविंद्र अत्तरदे (वय-50) ह्या 28 जानेवारी 2015 रोजी शहरातील गणपतीनगरात आल्या होत्या. त्या दरम्यान, सकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन तरूण मोटारसायकलीवरून येवून त्यांनी रजनी अत्तरदे यांच्या गळ्यातील 8 ग्रँमची सोन्याची चेन ओढून नेली होती. यानंतर त्याच दिवशी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या दोन ते तीन दिवसानंतरच सोनसाखळी चोरटे केतन विजय पाटील (वय-30), हर्षल सुनिल भावसार (वय-28) यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. सदर खटला हा न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात सुरू झाला होता. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी 9 साक्षीदार तपासले. रजनी रविंद्र अत्तरदे यांच्या सोन्याची चेन चोरी केल्याप्रकरणी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांनी मंगळवारी निकाल दिला. त्यात न्या. पाटील यांनी आरोपीकेतन विजय पाटील (वय-30), हर्षल सुनिल भावसार (वय-28) यांना तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. त्यात भादंवि कलम 392 नुसार 3 वर्ष कारावासाची शिक्षा, 10 हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.