सोनिया गांधींचा गुडबाय!

0

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 साली हत्या झाल्यानंतर, एकवेळ मी मुलांना भीक मागताना बघू शकेल, पण राजकारणात येणार नाही असे म्हणणार्‍या सोनिया गांधींनी आठ वर्षे स्वत:ला राजकारणापासून लांब ठेवले. पण काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी त्यांनी 1998 साली पक्षाध्यक्ष पद स्वीकारले. आता तब्बल 19 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहे. काँग्रेसमधील सोनियांचा वारसदार म्हणून राहुल गांधींचे नाव घोषित झालेले आहे. सध्या भारतीय राजकारणात काँग्रेसची स्थिती दोलायमान अशी आहे. जवळ जवळ सर्वच विरोधी पक्ष भाजपच्या झंझावातसमोर नेस्तनाबूत झाले आहेत, अशीच परिस्थिती सोनिया गांधींनी पक्षाची सूत्रे हाती घेतली तेव्हा होती, पण त्यावेळी भाजपच्या वाढत्या प्रभावाला मागे टाकत काँग्रेसला संजीवनी मिळवून दिली होती.

राजीव गांधींची हत्या व्हायच्या आधी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल होते. पण 1996 च्या निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस सत्तेबाहेर गेली. याच वर्षी पहिल्यांदा त्रिशंकू संसद अस्तित्वात आली. या कालखंडात देशाने तब्बल तीन पंतप्रधान पाहिले. त्यानंतर 1998च्या निवडणुकीत केवळ 413 आणि नंतरच्या निवडणुकीत पूर्ण पाच वर्षांसाठी अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार दिल्लीत होते. त्यामुळे 2004 च्या निवडणुकीत काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे मोठे आव्हान सोनिया गांधींसमोर होते. त्याला कारणही तसेच होते. कारण 1998 साली सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यानंतरही काँग्रेसला विजय मिळत नव्हता. सुदैवाने 2004च्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेनुसार जागा मिळाल्या. केवळ 150 उमेदवार निवडून आलेले असतानाही काँग्रेसने अन्य पक्षांच्या मदतीने दिल्लीत आपले सरकार आणले. त्यावेळी बसप, सपा, एमडीएमके आणि कम्युनिस्ट पक्षांनी काँग्रेसला साथ दिल्यामुळे यूपीए सरकार स्थापन झाले. त्यानंतर 2009च्या निवडणुकीतही काँग्रेसने चांगली कामगिरी करताना 205 जागा मिळवल्या. त्यावेळीही अन्य सहकारी पक्षांच्या मदतीने त्यांनी मनमोहन सिंग सरकारची स्थापना केली. या दोन्ही निवडणुकांमधील विजयाचे सारे श्रेय सोनिया गांधींना देण्यात आले होते. त्याच वर्षी फोर्ब्स मासिकाने त्यांचा जगातील सर्वात शक्तिशाली महिला नेत्या असल्याची घोषणा केली होती.

एकीकडे यशाची चव चाखलेल्या सोनिया गांधींना नंतरच्या काळात काँग्रेस नेत्यांचे भ्रष्टाचार, विविध घोटाळ्यांच्या आरोपांना सामोरे जावे लागले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर त्यांचा देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असलेल्या 2 जी घोटाळ्याशी संबंध असल्याचे म्हटले आहे. याशिवाय रॉबर्ट वढेराला अनेक देशांमध्ये जमीन घेण्यासाठी सोनिया गांधींनी मदत केल्याचाही आरोप झाला. न्यायालयात हे आरोप सिद्ध झाले नाहीत. पण, त्यामुळे भारतीय राजकारणात काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली हे नाकारता येत नाही. एक वेळ राजकारणात येणार नाही, असे ठासून सांगणार्‍या सोनिया गांधींनी सर्वात जास्त काळ पक्षाचे अध्यक्षपद सांभाळले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधीही एवढा काळ अध्यक्षा राहिल्या नाहीत.

– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117