सोनीचे प्रसारण चोरून दाखवणार्‍या केबल नेटवर्कच्या तिघांना अटक

0

नवी मुंबई । सोनी चॅनल व केबल नेटवर्क कंपनी यांच्यात चॅनेल्सचे अधिकृतरीत्या प्रसारण करण्यासाठी असलेला करारनामा संपलेला असतानाही तो पुढे न वाढवता अनधिकृतपणे सोनी कंपनीच्या चॅनेलचे प्रसारण करणार्‍या केबल नेटवर्क कंपनीच्या तिघांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे केबल क्षेत्रात खळबळ माजली असून, प्रकरण मिटवण्यासाठी भाजप आमदाराची मदत घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

अमित उपाध्याय, पुष्कराज व अशोक वायकर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे रिचनेट केबल प्रा. ली. कंपनीचे मालक आहेत. त्याचबरोबर त्यांना अनधिकृतरीत्या सोनी कंपनीचे चॅनेल्स पुरवणारे मुंबई येथील डिजिस्पेस केबल नेटवर्कचे अनिल सिंग व इतर यांच्याविरुद्ध सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात कॉपीराइट अ‍ॅक्ट 1957 चे कलम 63,69 सह 37,51 अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सोनी कंपनीचे कन्सल्टंट उपेंद्र जळगावकर यांना रिचनेट कंपनीचा सोनी कंपनीसोबत करारनामा संपून त्यांनी करारनाम्याचे नूतनीकरण केले नाही व कंपनीची देणी थकवली आहे समजले असता त्यांनी कंपनीशी वारंवार संपर्क साधून व लेखी पत्र पाठवून त्यांना कंपनीच्या थकबाकीची पूर्तता करून करारनाम्याचे नूतनीकरण करण्यास सांगितले. परंतु, त्यांनी तसे केले नाही. म्हणून सोनी कंपनीने केबल नेटवर्कची सोनी कंपनीची केबल सेवा बंद केली. त्यानंतर सदर रिचनेट कंपनीने मुंबई येथील डिजिस्पेस केबल नेटवर्क यांच्याकडून अनधिकृतपणे सोनी कंपनीचे चॅनेल्स घेऊन त्यांच्या केबल नेटवर्कवर प्रसारित करण्यास सुरुवात केली. सोनी कंपनीने सदर रिचनेट केबल नेटवर्कला लेखी नोटीस पाठवून सूचना दिली की त्यांनी हे अनधिकृत प्रसारण बंद करावे अन्यथा त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरीसुद्धा त्यांनी अवैध प्रसारण चालूच ठेवले. म्हणून सोनी कंपनीने सदर रिचनेट व डिजिस्पेस केबल नेटवर्क विरुद्ध कारवाई करण्यासाठी उपेंद्र जळगावकर यांना अवैध प्रसारणाची चौकशी करण्यास सांगितली.

नरेश सिंग याला ताब्यात
चौकशीअंती खात्री पटल्यानंतर जळगावकर यांनी सदरची तक्रार पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली. त्यावेळी पोलीस उपायुक्त यांनी त्वरित सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्वरित बेलापूर येथील हिल्टन सेंटरमध्ये रिचनेट केबल नेटवर्कच्या केबल कंट्रोल रूममध्ये जाऊन छापा टाकला. त्या वेळेस सोनी कंपनीने चॅनेल्सचे प्रसारण चालू होते. पोलिसांनी सदर घटनास्थळाहून 1 फायबर ऑप्टिकल नोड व डिजी कंपनीचा सेट टॉप बॉक्स जप्त केला तर त्याचवेळी टेक्नीशियन नरेश सिंग यांस ताब्यात घेतले.