नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावाने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. दररोज सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. आज गुरुवारी ६ रोजी पुन्हा सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी वाढ झाली, त्यामुळे सोन्याने ५६ हजारांचाही टप्पा ओलांडत. ५६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर सोन्याचे दर पोहोचले आहे. चांदीतही अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर चांदीचे दर आहेत. कोरोनामुळे गुंतवणूकदारांनी पारंपारिक गुंतवणुकीचा मार्ग असलेल्या दागिन्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. सोने-चांदीला वाढलेली मागणी व त्या प्रमाणात न होणारा पुरवठा या कारणांमुळे सोने-चांदीत सातत्याने भाव वाढ आहे.
दोनच दिवसात चांदीत तब्बल सहा हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यापासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्या-चांदीत तर दोन दिवसात मोठे विक्रम झाले आहेत. मंगळवारी ६७ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीत बुधवारी साडेतीन हजाराने वाढ होऊन ती ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यानंतर सलग दुस-या दिवशी गुरुवारी त्यात आणखी अडीच हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.