लोणावळा । लोणावळा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे हैद्राबाद येथील एका तरुणाची हरविलेली प्रवासी बॅग परत मिळाली. पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा ऐवज असलेली ही बॅग तरुणाच्या आईच्या हाती सुपूर्त केली. 5 फेब्रुवारीला नागरराज (वय 36, रा. हैद्राबाद) हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून हुसैनसागर एक्सप्रेसने हैदराबादला जात होते. मात्र सोमवारी ही एक्सप्रेस दोन तास उशीराने सुटली. या गडबडीत नागरराज त्यांचे रिझव्हेशन असलेल्या डब्यात न बसता दुसर्या डब्यात बसले. कल्याण येथे ते रिझर्व्हेशन असलेल्या डब्यात जाऊन बसले. त्यावेळी ते बॅग घेण्यास विसरले. कर्जतजवळ आल्यावर त्या डब्यातील प्रवाशांनी सदर बॅग कोणाची आहे. याबाबत प्रवाशांना विचारणा केली असता. बॅगसंदर्भात कोणीही होकार दिला नाही. त्यानंतर प्रवाशांनी या बेवारस बॅगबाबत रेल्वेतील तिकीट निरीक्षक यांना कल्पना दिली. संबंधित तिकीट निरीक्षक यांनी या घटनेची माहीती लोणावळा रेल्वे सुरक्षा बल व लोणावळा लोहमार्ग पोलिसांना दिली.
बॅगेत 1 लाख 90 हजाराचा ऐवज
हुसैनसागर एक्सप्रेस लोणावळा स्थानकावर येताच लोणावळा रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी डबा नंबर एफ-8 मध्ये शिरून बॅगेची तपासणी करून ताब्यात घेतली. बॅगमध्ये मिळालेल्या डायरीवरून रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्पाल सिंग यांनी नागरराज यांच्याशी लाल व काळ्या रंगाच्या प्रवासी बॅगबाबत संपर्क साधला असता नागरराज यांनी सदर बॅग माझी असल्याचे सांगितले. तो पर्यंत नागरराज हे हैद्राबादच्या जवळपास पोहचले होते. त्यावेळी त्यांनी बॅग आईकडे सोपविण्याची विनंती पोलिसांना केली. मंगळवारी रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्पाल सिंग, विजय हुपेले, रवी उपाध्याय, ए. के.यादव यांनी सदर बॅग मुद्देमालासह लक्ष्मी रामनाथ यांच्याकडे सुपूर्द केली. या बॅगमध्ये 30 ग्रॅमची सोन्याची चैन, 17 व 20 ग्रॅमचे दोन सोन्याचे नेकलेस असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचे दागिने व इतर 10 हजार रुपयांचा माल असा एक लाख 90 हजारांचा ऐवज होता. बॅग व बॅगमधील किंमती ऐवज परत मिळाल्याने लक्ष्मी यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.