Bodwad police arrested Pasar woman for identity theft बोदवड : वडिलांशी ओळख असल्याची बतावणी करीत गॅस हंडीची मागणी करीत मोबाईलसह सोन्याची पोत लांबवण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील राजूरला घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी संशयीत महिलेला अटक केली आहे. महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोनी आकाश कोळी (25) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.
ओळख असल्याची साधली संधी
राजूर येथील शांताराम बिजारणे यांच्या घरी 29 ऑगस्ट रोजी त्यांची मुलगी घरी एकटी असतांना एका व्यक्तीने वडीलांशी ओळख असल्याची बतावणी करत व फोनवर बोलण्याचे नाटक करून गॅस हंडी मागितली. मुलगी गॅस हंडी घेण्यास गेली असता या इसमाच्या सोबत असलेल्या महिलेने टीव्ही जवळ ठेवलेला मोबाईल, सोन्याची मणी पोत लांबवली. गॅस हंडी घेऊन गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर बिजारणे यांच्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसंत निकम, मुकेश पाटील, भगवान पाटील, निलेश सिसोदे यांचे पथक नेमून तपास करत 24 तासाच्या आत आरोपी राजू दीपा कोळी (रा.चारठाणा, ता. मुक्ताईनगर) यास अटक केली तसेच चोरी केलेला मुद्देमाल व गुन्हे कामी वापरलेली मोटारसायकल जप्त केली होती. मात्र गुन्ह्यात सहभागी असलेली आरोपी महिला सापडली नव्हती.
गोपनीय माहितीवरून अटक
आरोपी कोळीसोबत असलेली महिला बोदवड शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सोनी आकाश कोळी (25) हिला अटक करण्यात आली. महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या दोघांनी तालुक्यातील जलचक्र गावी सुद्धा अशीच फसवणूक करत एका महिलेच्या घरून हंडी लंपास केली असल्याची कबुली या दोघांनी दिली. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहेत.