सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विदेशी महिलांना अटक

0

मुंबई । विदेशातून चोरट्या मार्गाने सोने घेऊन आलेल्या दोन महिलांना हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केल्यानंतर या दोन्ही महिलांकडून या अधिकार्‍यांनी चार किलो वजनाचे सोने जप्त केले. या सोन्याची किंमत सुमारे सव्वाकोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत विदेशात चोरट्या मार्गाने सोन्याच्या तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी सुरू केली होती. रविवारी पहाटे सिंगापूरहून जेट एअरवेज विमानातून आलेल्या दोन महिलांना या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोन्ही महिलांकडे 24 कॅरेटचे 4 किलोवजनाचे सोन्याचे दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत सुमारे सव्वाकोटी रुपये आहे. या कामी त्यांना ठरावीक रक्कमेचे कमिशन मिळणार होते.