सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी

0

मुंबई। केंद्रशासनाने देशभर नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचे तीव्र पडसाद बाजारावर उमटले. याचा फटका आज अक्षय्य तृतीयावर होईल, अशी भीती होती, मात्र, तरीही मुंबईतील बहुतांश सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. आज सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 30 हजार रुपये इतका आहे. तरीही हौसेला मोल नसते, याप्रमाणे सुवर्णालंकार खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये बरीच गर्दी दिसली.

अक्षय तृतीया हा मुहूर्त शुभ मानला जातो. या दिवसाच्या आदल्यादिवसापासूनच ज्वेलर्सच्या दुकानांत ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची विक्री 30 टक्के वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. याचा परिणाम इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचा दर वाढेल पण खरेदीच्या स्तरावर याचा मात्र परिणाम होणार नाही.
गेल्या वर्षी अक्षय्य तृतीया हा दिवस इतका उत्साहात साजरा झाला नाही. मात्र, यंदा ग्राहकांचा उत्साह अधिक आहे. गेल्यावर्षी सोन्याचा भाव हा 29 हजार 850 रुपये इतका होता. तर यंदा तो भाव 30 हजार इतका गेला आहे. यंदा दोन दिवस अक्षय्य तृतीया आल्यामुळे ग्राहक सोन्याची खरेदी अधिक करू शकतात. तसेच यंदा अधिक प्रमाणात गोल्ड एक्सपोर्ट केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीनंतर या दिवशी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा बाजारात उपलब्ध होईल. लोकांनीदेखील या मुहूर्तावर अधिकाधिक सोने खरेदीचा विचार केला आहे, असे मुंबई ज्वेलर असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले.