सोमनाथ पाटील : अभ्यासू पत्रकार, हाडाचा शिक्षक, दिलदार मित्र

0

गेल्या गुरुवारी सोमनाथ पाटील यांचा मला फोन आला. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणे फ्रेश होता. जसलोक रुगणालयातून फोन आल्याचे ते म्हणाले. त्यांच्यावरील मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेची तारीख लवकरच ठरणार होती. त्याबाबतच ते सांगत होते. मी त्यांना धीर देत म्हटले, पाटील साहेब, चिंता करू नका. सर्व काही व्यवस्थित होईल. हा आमचा संवाद आठ दिवसांपूर्वी झाला.

मात्र, आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि सुन्न झालो. 65 वर्षे हे काही जाण्याचे वय नाही. गेली काही वर्षे पाटील डायलेसिसवर होते हे खरे. पण त्यामुळे ते कधी हताश झालेले दिसले नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य कधी मावळले नाही. त्यांचा विनोदी स्वभाव आजारपणामुळे गंभीर झाला नाही. त्यात काही काळापूर्वी त्यांच्या पायांना दुखापत झाली. फिरण्यावर मर्यादा आल्या. पण सोमनाथजी कधी कुरकुरले नाहीत. जणू ते संकटांना आव्हान देत म्हणत होते, तुम्ही मला किती छळताय ते मी पाहतो. तुमचा मुकाबला करायला मी समर्थ आहे! गोताणे, जिल्हा धुळे सारख्या ग्रामीण भागातून आलेले पाटील आपल्या बुद्घिमतेच्या आणि कर्तबगारीच्या बळावर यशाची एक एक पायरी चढत गेले. 1977 साली पत्रकारितेचा शुभारंभ केल्यानंतर गावकरी, एकमत, सकाळ आदी वर्तमानपत्रात त्यांनी मोठमोठी पदे भूषवली. दरम्यान, 1987-89 या काळात नगरविकास विभागांतर्गत परिक्षा उत्तीर्ण होऊन ते नगरपालिका मुख्य अधिकारी झाले. पण त्यांचे मन सरकारी सेवेत रमले नाही. 1989 मध्ये ते पुन्हा पत्रकारितेत आले. सकाळचे सहसंपादक म्हणून 1989 ते 2001 पर्यंत कार्यरत होते.

शिक्षण, पत्रकारिता व पर्यटन हे पाटील यांचे आवडीचे विषय. परिणामी, त्यांनी परदेश प्रवास भरपूर केला. रशियासह अनेक देशांना भेटी दिल्या. हाँगकाँगचे ऐतिहासिक हस्तांतरण होत असताना पाटील तेथे वार्तांकनासाठी गेले होते. या उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल त्यांना बॅ. नाथ पै पुरस्कारदेखील मिळाला. पाटील यांनी एक इंग्रजी व सहा मराठी पुस्तके लिहिली. त्यापैकी त्यांचे तिसरे मुंबई हे पुस्तक विशेष गाजले. त्याला मुंबई मराठी पत्रकार संघाचा अप्पा पेंडसे पुरस्कार मिळाला. ‘रेवडी आणि खयखस’ हे त्यांचे विनोदी पुस्तक. तेदेखील वाचनीय ठरले. गेल्या फेब्रुवारीत त्यांचे ‘शहरे, स्मार्ट शहरे आणि पसरती मुंबई’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांना बाळकृष्ण कोनकर यांचे मोलाचे संपादन साहाय्य लाभले. पण या पुस्तकाची सुधारित आवृत्ती पाहण्याचे भाग्य पाटील यांना लाभले नाही. सोमनाथजी केवळ अभ्यासू पत्रकार नव्हते, तर ते हाडाचे शिक्षक होते. मुंबई मराठी पत्रकार संघ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ येथे अध्यापनाचे काम त्यांनी केले. त्यांच्या जाण्याने मी एक दिलदार मित्र गमावला आहे.

– नरेंद्र वि. वाबळे
अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ
9820152936