सोयगाव येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीची संख्या पाचवर

0

सोयगाव। तालुक्यातील हनुमंतखेडा येथील अल्पवयीन बालिकेच्या खून प्रकरणी बुधवारी मध्यरात्री आणखी एक आरोपीस पोलिसांनी अटक केली असल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या पाच झाली आहे. दरम्यान मंगळवारी 18 रोजी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी मुश्ताक शेख, भुरा बालचंद पवार, ज्ञानेश्वर राठोड यांना अटक केली. एक नवीन संशयीत आरोपी गळाला लागला आहे. आरोपी महेमूद शेख मजीद (वय 41) यांच्यासह पाचही जणांवर सामुहिक अत्याचारचा प्रयत्न, पोक्सो कायदा बाल अत्याचार आदी नवीन कलम लावण्यात आले आहे. याप्रकरणी पाचवा आरोपी महेमूद शेख मजीद यास गुरुवारी 20 औरंगाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यास सोमवार 24 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्य आरोपी मुश्ताक यास पोलिसांनी घटनास्थळी आणून पुन्हा चौकशी करुन पंचनामा केला आहे. याप्रकरणात आणखी तीन आरोपी गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मुख्य आरोपीच्या बापाचाही यात हात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्याकडे खटला द्या
पिडीतेच्या बाजूने विशेष सरकारी वकील म्हणून जेष्ठ विधिज्ञ अँड.उज्ज्वल निकम यांच्याकडे खटल्याचे सुत्र द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. गोरसेना संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दत्ता राठोड यांनी मागणी केली आहे. अल्पवयीन बालिकेच्या मृत्यू प्रकरणी व सामुहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पाचही नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी गोरसेना ठाम आहे.

शाळांमध्ये श्रद्धांजली
समाजात स्थान नसलेल्या विघातक कृत्याला विरोधाचा संघर्ष करत प्राणाची आहुती देणार्‍या अल्पवयीन बालिकेला सोयगाव तालुक्यात घटनेच्या सलग सहाव्या दिवशीही श्रद्धांजली अर्पण करण्याचे कार्यक्रम सुरुच होते. राज्यभरात या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय कार्यालय, शाळांमध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे. शाळेत प्रार्थनेप्रसंगी विद्यार्थी बालीकेस श्रध्दांजली अर्पण करत आहे.

तालुका या घटनेमुळे संवेदनशील झाला आहे. जिल्हा परिषदेच्या 95 प्राथमिक शाळा व हायस्कूलमध्ये 20 श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याने 12 हजार विद्यार्थ्यांनी प्राणाची आहुती देणार्‍या शूर बालिकेला श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय, सामाजिक संघटनेकडून मोर्चा काढून संताप व्यक्त् करण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
निरापराध चिमुरडीची निर्घुन हत्या करण्यात आल्याने संपुर्ण बंजारा समाजात तिव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यभरातील बंजारा समाजबांधवांच्या वतीने आरोपींना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. जळगाव येथे देखील घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले व आरोपींना अटक करुन शिक्षेची मागणी करण्यात आली. जिल्ह्याभरातील समाजबांधवांची यावेळी उपस्थिती होती.