भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आरओएच डेपोतील कर्मचार्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने तसेच अन्य सोयी-सुविधांसाठी डेपोमधील सुमारे 350 रेल्वे कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केल्याने रेल्वे प्रशासनाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. ऑल इंडिया एससी अॅण्ड एसटी रेल्वे कामगार असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधीर जंजाळे व युनियन पदाधिकार्यांनी जोपर्यंत कायमस्वरूपी सोय होत नाही तो पर्यंत काम बंद राहील व आंदोलन सुरू राहील असा पवित्रा घेतल्यानंतर डीआरएम प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. शुक्रवारी कर्मचार्यांसाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली तसेच लवकरच याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले.
तक्रारींना केराच्या टोपलीमुळे आंदोलन
शहराच्या तापमानाचा आधीच पारा वाढला असतानाच आरओएच डेपोमध्ये कर्मचार्यांना पिण्यासाठी साधेपाणीदेखील नसल्याने त्यांना अनेक दिवसांपासून मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कामगारांनी संबंधीत अधिकार्यांना याबद्दल वारंवार सूचना व तक्रारीदेखील केल्या मात्र या गंभीर विषयाची कोणीच दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे अधिकार्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली. आंदोलनानंतर एनआरएमयु प्रतिनिधी व रेल्वे कामगार संघटना पदाधिकार्यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी त्वरीत संपर्क साधून चर्चा केली. या गंभीर समस्येवर तोडगा काढून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार असल्याची ग्वाही मिळाल्यानंतर सुमारे दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.