भुसावळ। गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलीकम्यूनिकेशन विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा क्षेत्रात संशोधन करतांना ऊर्जा निर्मितीसाठी मागील 6 महिन्यांपासून परिश्रम केले. तसेच शेती विषयक आधुनिकीकरण वाढवण्यावर भर देत प्रकल्प तयार करण्यात आलेले आहे. सौर पॅनल्स स्वयंचलित पद्धतीने सूर्याच्या दिशेने फिरु लागल्यास त्यातून पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिकची वीजनिर्मिती करता येऊ शकते. या कल्पनेतूनच ‘सोलर ट्रॅकिंग सिस्टीम’ यंत्रणेची निर्मिती केली आहे.
नाशिकची कंपनी करणार यंत्रणेची निर्मिती
पूर्वी एकाच कोनामध्ये बसवलेल्या पारंपरिक सौर पॅनल्सला स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वित करुन या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. या यंत्रणेचा जनसामान्यांच्या घरामधील सौर पॅनल्समध्ये वापर व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू असून नाशिक यूनिवर्सल इंजिनियरर्स कंपनीच्या एका उद्योजकाने या यंत्रणेची निर्मिती आणि विक्री करण्याची तयारीही दर्शवली आहे.
वीज वापरासह रात्रीला वीज संचय करणे शक्य
देशाच्या अनेक भागात बाराही महिने चांगले उन्ह असते. या सूर्यप्रकाशातून वीजनिर्मितीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. स्नेहा रजाने, श्रद्धा भंगाळे, सलोनी भटनागर, रश्मी श्रीवास या विद्यार्थ्यांनी प्रा. संतोष अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन सौर मॉडल तयार केले. त्याच्या मदतीने सूर्यप्रकाश असताना एकाच वेळी थेट वीज वापरासह रात्रीला वीज संचय करणे शक्य झाले आहे.
अशी केली निर्मिती
पूजा चौधरी, हर्षदा सिंह, हर्षल वासकर, पवन भाराड यांनी ऑटोमॅटिक प्लांट इर्रीगेशन सिस्टिमद्वारे शेतकार्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून हा प्रकल्प हाती घेऊन पूर्णत्वास आणला आहे. या प्रकल्पात ऑर्डइनो, आईसी, सर्वो मोटार, रिले सर्किट, सेन्सर्स आणि मोटार पंप आदींचा वापर केला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी यांची काळाची गरज बघून जमिनीतले पाणी सुकल्यावर आटोमॅटिक जमिनीला पाणी दिले जाईल असे यंत्र विद्यार्थ्यांनी बनवले आहे. याचा वापर शेतीसाठी, बागांसाठी, मैदानांसाठी व ठिबक सिंचनासाठी तसेच इतर अनेक प्रकारे होवू शकतो.