पुणे : हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलिस अधिकार्यांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने 25 सप्टेंबररोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, तुषार काकडे, संतोष शिंदे, अंगद माने, संगीता भालेराव, राहुल पोकळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़
दखलपात्र गुन्हा दाखल करुन तपास सुरु!
शांताराम कुंजीर यांनी सांगितले की, डॉ. खोले यांनी स्वयंपाकी महिला निर्मला यादव यांच्याविरोधात तक्रार करू नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन विनंती केली होती. परंतु खोले यांनी ही विनंती धुडकावून लावत निर्मला यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन पोलिस अधिकार्यांनी निर्मला यादव यांच्या अदखलपात्र गुन्ह्यांचे रूपांतर दखलपात्र गुन्ह्यात करून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी गुळवे पाटील कोर्टाकडून परवानगी घेऊन तपास चालू केला आहे. त्यामध्ये तपासाअंती चार्जशीट दाखल करून गंभीर कलमे वाढवण्याची शक्यता आहे़ तसेच पोलिस अधिकार्यांनी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया, तपास सुरू केल्यामुळे 25 सप्टेंबररोजीचा नियोजित निषेध मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे. मराठा अस्मिता परिषद 27 सप्टेंबररोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केली आहे.