मराठा क्रांती मोर्चाचा पुण्यात 25 सप्टेंबरला मोर्चा
पुणे : घरकामासाठी आलेल्या महिलेने जात लपवून सोवळ्यातला स्वयंपाक केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात करणार्या हवामान विभागातील अधिकारी डॉ. मेधा खोले यांच्या विरोधातील जनक्षोभ शांत झाला असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा हे सोवळे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शांत असणार्या मराठा क्रांती मोर्चाने या प्रकरणात लक्ष घातले असून, 25 सप्टेंबरला पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची माहिती दिली. या मोर्चाला संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेसह विविध मराठा संघटनांनी पाठिंबा दिल्याने मोर्चाची व्याप्ती वाढणारी आहे. मेधा खोले यांनी स्वयंपाकी महिला निर्मला यादव यांच्यावर गुन्हा दाखल करू नये यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन विनंती केली होती. परंतु, खोले यांनी विनंती धुडकावून लावत निर्मला यादव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, असे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.
डॉ. खोलेंना अटक करा
मराठा समाजातील निर्मला यादव या घरकाम करणार्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. सोवळे मोडले म्हणून घरकाम करणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करणार्या डॉ. खोले यांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे शांताराम कुंजीर यांनी दिली. मराठा क्रांती मोर्चा या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी येत्या 25 सप्टेंबरला लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयदरम्यान मोर्चा काढणार असून, तीव्र आंदोलन करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. सर्वप्रथम पुण्यातील या सोवळेप्रकरणावर संभाजी ब्रिगेडने आवाज उठविला होता. संबंधित महिला मराठा समाजाची असतानाही समाजाकडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत होत. दरम्यान, सर्वस्तरातून झालेल्या चौफेर टीकेनंतर व राजकीय पक्ष, संघटनांनी केलेल्या आंदोलनांनंतर डॉ. मेधा खोले यांनी आपली तक्रार मागे घेतली होती. आता मराठा क्रांती मोर्चाने याप्रकरणी आक्रमक होत डॉ. मेधा खोले यांच्या अटकेची मागणी केली आहे.
सोवळे, जात-पात मानणार्या डॉ. खोले
डॉ. मेधा खोले यांना गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी ब्राम्हण महिला हवी होती. 2016 मध्ये निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री त्यांच्याकडे आली. कामाची गरज असल्याचे सांगत त्यांनी खोले यांच्याकडे स्वयंपाकाचे काम मागितले. खोले यांनी निर्मला यांच्या घरी जाऊन ती महिला ब्राम्हण आहे की, नाही याची चौकशी केली. त्यानंतर तिला स्वयंपाकाचे काम दिले होते. यावर्षीही गौरी-गणपतीतही निर्मला यांनीच मेधा खोले यांच्या घरी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला. पण निर्मला ह्या ब्राम्हण नसल्याच्या खोले यांच्या घरी आलेल्या गुरूजींनी त्यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा शाहनिशा करण्यासाठी खोले या निर्मला यांच्या घरी गेल्या. आपले नाव निर्मला यादव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर दोघींमध्ये वाद झाला. यानंतर निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळ व फसवणूक केल्याची तक्रार मेधा खोले यांनी सिंहगड पोलिसांत केली होती. सिंहगड पोलिसांनीही अशाप्रकारची तक्रार दाखल करून घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
खोलेंविरूध्द शेजार्यांच्याही तक्रारी
डॉ. खोले यांच्याविरूध्द त्या राहत असलेल्या शिवाजीनगर येथील सीतापार्क सोसायटीतल्या रहिवाशांनी तक्रार केली आहे. खोले त्यांच्या बहिणीसमवेत या सोसायटीत राहतात. दोघीही अविवाहित आहेत. सोसायटीतल्या कामांमध्ये त्या आडकाठी आणतात. याबाबत खोले यांच्याविरोधात अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्याची माहिती परदेशींनी दिली. खोले यांनीही आमच्याविरोधात तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले. शेजार्यांशी त्या नेहमी वाद घालतात. अनेकदा रात्री 12 वाजता केस मोकळे सोडून जिन्यावर अंधारात बसलेल्या असतात, त्यामुळे रात्री-बेरात्री कामावरून येणार्यांना भीती वाटते, अशीही रहिवाशांची तक्रार आहे.