सोशल मिडीयामुळे वाचन संस्कृती लोप पावतेय

जनशक्तीचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी :l भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात युवा पुरस्काराचे वितरण

भुसावळ : सोशल मिडीयाचा अतिरेक वाढला असून त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आजचा युवक नेमक्या कोणत्या दिशेने भरकटत चालला आहे, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत दैनिक जनशक्तीचे संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी येथे व्यक्त केले. शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात बुधवार, 22 डिसेंबर रोजी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या तरुणाईला ‘युवा पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.परदेशी बोलत होते.

या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती
दैनिक जनशक्तीचे संपादक यतीनदादा ढाके यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमासाठी विचार मंचावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, महाविद्यालयाच्या प्राचार्य मीनाक्षी वायकोळे, ‘जनशक्ती’चे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी, नेहरू युवा केंद्राचे नरेंदर डागर, माजी पोलिस पाटील मधुकर पाटील, पुरनाड सरपंच मनीषा देशमुख, उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे, दिनेश भंगाळे, स्वच्छतादूत रणजीत राजपूत, रजत बढे, शुभम महाजन, प्रा.स्मिता चौधरी आदींची उपस्थिती होती.

सोशल मिडीयाच्या युगात लिखाण कौतुकास्पद
डॉ.परदेशी भाषणात म्हणाले की, कॉपी पेस्ट व फॉरवर्ड या सोशल मिडीयाच्या युगात केतन फिरकेसारखा युवा विद्यार्थी पुस्तक लिहितो ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे. तरुणाईसाठी ही बाब प्रेरणादायी असल्याचे सांगत भुसावळातील रहिवासी व पुण्यातील यशस्वी उद्योजक स्व.कुंदन ढाके यांच्या कार्याचा त्यांनी याप्रसंगी आढावा मांडला. स्व.कुंदन ढाके हे भुसावळकरांना परीचित असून त्यांनी निश्चितच अल्प काळात केलेली प्रगती तरुणांसाठी प्रेरणादायक आहे मात्र दुर्दैवाने कोरोना काळात त्यांचे झालेले निधन वेदनादायी असल्याचेही ते म्हणाले.

एनसीसीमुळे देशभावना जागृत नरेंदर डागर
एनएसएस व एनसीसीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीपर भावना जागृत होते. आजचा युवा सक्षम करण्यासाठी तरुणाईच्या विचाराला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. याच धर्तीवर नेहरू युवा केंद्राचे काम चालते, असे नेहरू युवा केंद्राचे नरेंदर डागर म्हणाले.

युवक पुस्तकांपासून दुरावला : मोहन फालक
मोहन फालक म्हणाले की, सोशल मिडीयाच्या युगात पुस्तकांपासून युवक दुरावला आहे. सोशल मिडीयाचा अतिरेक थांबवणे काळाची गरज असून केतन फिरके या विद्यार्थ्याने अल्प वयात पुस्तक लिहिण्याची केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करावा व त्याच्या प्रती लायब्ररीत ठेवाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे, रणजीत राजपूत, दिनेश भंगाळे, सायली महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संस्कृती उगले तर आभार पुष्पक चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.