सोशल मिडीयावर अफवा पसरवणारे पोलिसांच्या रडारवर

0

गुन्हे होणार दाखल : सहा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचा बैठकीत ईशारा

भुसावळ- अमूक-अमूक गावात लहान मुले पकडणारी टोळी आली आहे वा लहान बालकांची हत्या करून त्यांची किडनी काढली जात असल्याचे संदेश सोशल मिडीयात टाकून जनतेच्या मनात भीती निर्माण करणारे पोलिसांच्या रडारवर असून अशा लोकांवर यापुढे पोलीस गुन्हे दाखल करणार असून अफवा पसरणार्‍यांची नावे पोलिसांना कळवावीत, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलिस मित्रांच्या बैठकीत केले. मंगळवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस मित्रांची बैठक घेण्यात आली. प्रसंगी निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक निरीक्षक मनोज पवार विचार मंचावर उपस्थित होते.

कायदा हातात घेतल्यास गय नाही -नीलोत्पल
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभुमीवर शहरात कोणीही संशयीत वाटल्यास त्यांची तत्काळ माहिती पोलिसांना द्यावी मात्र कुणी कायदा हातात घेतल्यास त्याची हयगय केली जाणार नाही, असे नीलोत्पल म्हणाले. राईनपाडा येथे मुले पकडणारी म्हणून टोळी समजून पाच जणांची हत्या झाल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. अशा अप्रिय घटना टळण्यासाठी शहरात सुध्दा कोणी अनोळखी व्यक्ती दिसल्यास वा संशयीत वाटल्यास त्याची माहिती पोलिस प्रशासनाला द्यावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक पोलिस मित्रांनी त्यांच्या मित्रांना मेसेजद्वारे कोणीही त्यांच्या पराीसरात संशयीत व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याबाबत कळवावे, अश्या सूचना नीलोत्पल यांनी दिल्या.