सोशल मिडीया वापरताना समाजमान्य शिष्टाचार पाळावेत

0

जनशक्तीचे कार्यकारी संपादक शेखर पाटील : भुसावळात जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात व्याख्यान

भुसावळ- सोशल मिडीया वापरताना समाजमान्य शिष्टाचार पाळण्याची गरज असून तसे झाल्यास त्यासारखा आनंददायी अनुभव नाही. तंत्रज्ञान तसे जोडण्याचे काम करते तसे तोडण्याचेही काम करते तर दोन समाजात स्मार्टफोन भिंतीचेही कामे करीत असल्याचे स्पष्ट मत दैनिक जनशक्तीचे कार्यकारी संपादन शेखर पाटील यांनी येथे व्यक्त केले. शहरातील सुरभी नगरातील जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात त्यांचे ‘सोशल मिडीया शाप की वरदान’ या विषयावर बुधवारी रात्री व्याख्यान झाले.

सोशल मिडीया हा पाचवा स्तंभ
शेखर पाटील पुढे बोलताना म्हणाले की, एका वर्तमानपत्राच्या संपादकाने प्रिंट मिडीयात काम करीत असताना डिजिटल मिडियावर बोलावे हा काहीसा विरोधाभासही आहे. लोकशाहीत पत्रकारीतेला चौथा स्तंभ संबोधले जाते मात्र आता यापुढे पाचवा स्तंभ ‘सोशल मिडीया’ असणार आहे. साक्री तालुक्यातील राईनपाडा गावातील गोसावी समाजातील भिक्षुकांच्या हत्येचा संदर्भ देताना पाटील म्हणाले की, त्या गावात कुठलेही वर्तमानपत्र जात नाही मात्र कुणीतरी मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मिडीयात टाकला अन् त्याची जगभरात दखल घेतली गेली. माझ्या मते ‘सोशल मिडीया शापही नाही अन् वरदानही नाही’. सोशल मिडीया वापरताना ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’ ही संकल्पना लक्षात ठेवल्यास निश्‍चित अप्रिय घटनांना आळा बसेल. घरात असणारे सिलिंडरदेखील एक प्रकारचा बॉम्बच आहे मात्र तो वापरताना आपण ज्या पद्धत्तीने काळजी घेतो त्या पद्धत्तीने सोशल मिडीयाचा वापर होणे गरजेचे आहे.

पत्रकारीतेत सकारात्मक बदल ‘जनशक्ती’ने घडवले
प्रिंट मिडीयासोबत डिजिटल क्षेत्रातही जनशक्तीने पर्दापण केले असून भुसावळातही आम्ही दैनिक जनशक्तीच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवल्याचे पाटील म्हणाले. शहरातील ताज्या घटना-घडामोडी अवघ्या काही वेळात आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगत सोशल मिडीया आता बाल्यावस्थेत असून त्याचा समाजमान्य शिष्टाचार पाळून वापर केल्यास त्यासारखा आनंददायी अनुभव दुसरा नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आगामी काळात फाईव्ह जी तंत्रज्ञान येणार असून पुढील काळ हा लाईव्ह स्ट्रीमिंगचा असणार आहे त्यामुळे दुर्घटनांचे लाईव्ह व्हिडिओदेखील पाहण्याची आपल्यावर वेळ येणार आहे. पूर्वी दैनिकात बातमी छापून आणण्यासाठी संपादकांसह उपसंपादकांकडे वशिला लावावा लागत होता मात्र आता जमाना बदलला असून आपण स्वतःच आपल्या कामाची, कार्याची बातमी यु ट्यूबवर अपलोड करू शकतो कारण लिहिणार्‍यापेक्षा आता वाचणारा हुशार आहे. तुमच्या गोष्टीत रस असेल तर कोट्यवधी लोक तुमचे चाहते बनतील. प्रत्येकाकडे एक स्टोरी आहे मात्र ती ऐकण्यासाठी तुमच्याकडे संयम असायला हवा, असे त्यांनी नमूद केले. आपण आता खर्‍या-खुर्‍या लोकशाही युगाच्या माध्यमात वावरत असल्याचे ते म्हणाले.

उमेश नेमाडेंचे कार्य कौतुकास्पद
केवळ एक राजकारणी म्हणून नव्हे तर विविध सामाजिक उपक्रमातून शहरवासीयांना आपलेसे करणार्‍या माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे पाटील म्हणाले. जय गणेश फौंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांचा त्यांनी आवर्जून उल्लेख करीत सर्वांना घेवून चालणारे व्यक्तीमत्व उमेश नेमाडे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोशल मिडीयामुळे मुलांशी संवाद हरपला
व्याख्यानानंतर अनेक ज्येष्ठांनी सोशल मिडीयाबाबत प्रश्‍न विचारले. हेमंत भंडारी यांनी सोशल मिडीयामुळे मुलांशी आपला संवाद कमी झाल्याचे सांगत ती नेहमीच मोबाईलमध्ये गुरफटत असल्याची व्यथा मांडली. सुधीर देशपांडे यांनी जाती-धर्माबद्दल तेढ निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करतानाच या बाबीला ठळक प्रसिद्धी द्यावी, असे सांगितले. एम.यु.पाटील यांनी तरुण पिढीने संयम बाळगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले तर अरुण मांडळकर यांनी सोशल मिडीयाबद्दल काही प्रश्‍न उपस्थित केले. सर्व ज्येष्ठांच्या प्रश्‍नांवर शेखर पाटील यांनी सकारात्मक उत्तर देत ‘सोशल मिडीया माझ्यासाठी आहे मी सोशल मिडीयासाठी नाही‘ ही भावना ठेवून ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’ या पद्धत्तीने त्याचा वापर करण्याचे आवाहन केले तर तरुण पिढीने संयमाने व ज्येष्ठांनी थोडेसे खोडकरपणे वागावे, असा सल्लाही दिला.

आपल्यासारखी संस्कारी पिढी घडणार नाही -उमेश नेमाडे
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, ‘सोशल मिडीया शाप की वरदान’ हे मान्य करता येणार नाही मात्र येणार्‍या पिढीला आपण कसे घडलो कदाचित हे कळणारच नाही कारण मागील काळात जाण्यासाठी त्यांना स्मार्टफोनचा वापर करावा लागेल. आपल्यासारखी संस्कारी पिढी कदाचित उद्या घडणार नाही, असे सांगून कदाचित दहा वर्षानंतर अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज नसेल कारण उद्याच्या पिढीला ती गरज भासणार नही, असेही त्यांनी सांगितले. शेखर पाटील हे भुसावळकर असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असून जिल्ह्यातील पत्रकारांना ते मार्गदर्शन करतात व असे डिजिटल पत्रकारीतील बाप व्यक्तिमत्व माझे मित्र असल्याचा आपल्या निश्‍चितच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार अरुण मांडळकर यांनी मानले. शिक्षक गणेश फेगडे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले.