सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तणाव

0

मुंबई : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने काल रात्री मानखुर्द आणि ट्रॉम्बे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाने पोलीस ठाण्याच्या दिशेने दगडफेक केली. तर, काही वाहनांना आग लावल्याने तणावात अधिक भर पडली होती. यावेळी दगडफेक करणार्‍या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांचा गोळीबार केला होता. रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यांत या तरुणाला रात्री उशिरा पेालिसांनी अटक केली. दुसरीकडे दंगल घडवणार्‍या पन्नासहून अधिक लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून वीस तरुणांना अटक केल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना आज दुपारी भोईवाडा येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेने घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सध्या तेथील वातावरण शांत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी तरुण हा ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरात राहत असून रात्री त्याने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ही पोस्ट काही लोकांच्या निर्दशनात येताच त्यांच्यात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर तेथील एक शिष्टमंडळ ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेले होते. या तक्रारीनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. गुन्हा दाखल होताच या तरुणाला चिता कॅम्प परिसरातून पोलिसांनी अटक केली. दुसरीकडे या शिष्टमंडळाशी चर्चा सुरू असताना पोलीस ठाण्याच्या बाहेर उभा असलेला जमाव प्रचंड आक्रमक झाला होता. या जमावातील लोकांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. या जमावाने पोलिसांच्या वाहनांना टार्गेट करून काही वाहनांना पेटवून दिले होते. या हल्ल्यात पंधराहून अधिक पोलीस तर वीसहून स्थानिक नागरिकांना दुखापत झाली होती. जमाव संतप्त झाल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांचा गोळीबार सुरु केला होता. त्यात दोन तरुण जखमी झाले होते. या घटनेने मानखुर्द आणि ट्रॉम्बे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने तिथे राज्य राखीव दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आल होती.

तसेच इतर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही मदतीसाठी बोलाविण्यात आले होते. याप्रकरणी जमावाविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी दंगलीसह अन्य भा.द.वि. कलमांतर्गत गुन्हा नोंदवून घटनास्थळीचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजच्या मदतीने सकाळपर्यंत वीसहून अधिक दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर दगडफेक करणे, पोलिसांच्या वाहनांना पेटवून देणे, दुखापत करणे आदी कलमांर्गत गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले आहे. सकाळी परिसरात शांतता होती. मात्र जागोजागी दगड, दारुच्या बाटल्याच्या काचा आणि चपला पडल्याचे दिसून आले. रात्री तणाव निर्माण झाल्याने सकाळी या परिसरातील सर्व दुकाने बंद होती. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सकाळी ट्रॉम्बे पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच शहाजी उमाप यांचीही भेट घेऊन त्यांनी दोषीवर सक्त कारवाई करण्याची विनंती केली होती.