सोशल मीडिया आणि समाजभान!

0

बार्शीच्या अमोल काळेच्या बाबतीत हाच सोशल मीडिया हा वरदान ठरलाय. अमोल काळे हा पारधी समाजातील असलेला उच्चशिक्षित मुलगा. हा समाज अजूनही मुख्य प्रवाहापासून बराच दूर असलेला दिसून येतोय. पारधी आहे म्हणून अमोलवर चोर असल्याचे काही दिवसांपूर्वी आरोप लावले होते. याच अमोलने उपोषणाच्या मार्गाने स्वतःवरील नसलेला डाग मिटवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात तो यशस्वी ठरला. या लढाईत सामाजिक चळवळीत काम करणार्‍या अनेक लोकांची त्याला प्रत्यक्ष मदत झाली. मात्र, त्याचवेळी अप्रत्यक्षपणे त्याला सोशल मीडियातूनदेखील जोरदार समर्थन मिळाले होते.

आता आयुष्यात दुसरी महत्त्वाची म्हणजे जगण्याची लढाई तो लढतोय. घरची स्थिती बेताचीच. या स्थितीमध्येही तो शिकला. शिकला म्हणजे वकिलीचे शिक्षण घेतले. ज्या स्थितीतून तो शिकला त्या स्थितीमध्ये हा खरंतर एक विक्रमच होता. काही दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर अवघ्या 9 व्या दिवशी त्याचा अपघात झाला. मेंदूला मार लागला. घरची परिस्थिती अगदी बेताचीच असल्याने जगण्याचा संघर्षाचा डोंगरच उभा राहिला. घरचे हवालदिल झाले. काय करावे हा मोठा प्रश्‍न समोर उभा ठाकलेला. मुलगा जीवन मरणाच्या दारात असताना कुठलाच उपाय घरच्या मंडळींसमोर नव्हता. मात्र, अमोलच्या अपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे महेश निंबाळकर, अमोल देशमुख, सुहास कांबळे, बालाजी डोईफोडे यांच्यासह अनेकांनी अमोलला वाचवण्याचा चंगच बांधला. सोशल मीडियात मदतीचे आव्हान केले. अनेकांनी सोशल माध्यमांतून आणि जमेल त्या मार्गाने अमोलला मदत मिळावी याकरिता मोट बांधली. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे मदत गोळा होत गेली, अमोलची तब्येतदेखील हळूहळू सुधारतेय. सोशल मीडियावर मदतीचे आव्हान केल्यावर त्याच्या खात्यावर पडणार एक एक रुपया त्याच्या एका एका श्‍वासाला बळ देत होता आणि तुटलेल्या घरच्यांनाही मजबूत करत होता. याच माध्यमातून केलेल्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधी कक्षानेही साथ देत मोठी मदत केली.

हे झालं एक उदाहरण. सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. सोशल मीडियावर कुबेर सारखा एक समूह आहे. जिथे आल्यावर परिवारात असल्याची जाणीव होते. उपेक्षितांच्या भल्यासाठी कुबेर समूहामार्फत अनेक उपक्रम चालवले जातात. अनेक नामवंत मंडळी या समूहासोबत जुळलेली आहेत. परफेक्ट आणि पारदर्शी कामाचे जिवंत उदाहरण असलेला कुबेर समूह आणि त्यातील सदस्य हे मनाने खरोखर कुबेर असल्याची जाणीव इथं वावरताना होते. सोबतच सोशल मीडियात आव्हान करून आदिवासी बांधवांना कपडे आणि शैक्षणिक साहित्य वाटणारे जळगावचे डॉ. रितेश पाटील असो पुण्यासारख्या शहरात गावाकडच्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी झटणारे शिवराज्य सेनेचे अ‍ॅॅड. हर्षवर्धन पाटील असो की, वरणगावात राहून वंचितांसाठी वह्या, पुस्तके, पेन गोळा करणारे वानखेडे दाम्पत्य असो किंवा बाबासाहेबांच्या जयंतीला हार-तुरे टाळून एक वही-एक पेन गोळा करणारी समृद्ध तरुणाई असो. ही सर्व मंडळी फेसबुकसारख्या सशक्त सोशल माध्यमांचा वापर समाजोपयोगी कारणांसाठी करणारे दूत वाटतात.

अशी एक नाही तर अनेक चांगली उदाहरणं आपल्या समोर आहेत. सोशल मीडियाचा फक्त निगेटिव्ह कारणांसाठी वापर करणारे फेक आयडीवाले आणि हे माध्यम फक्त नकारात्मकच आहे, अशी भूमिका घेणार्‍या लोकांनी या उदाहरणांची चाचपणी करणे गरजेचे आहे. आज जगताना व्हर्चुअल दुनियेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सोशल मीडिया हा पर्याय अनिवार्य झालाय. त्यामुळे याला टाळणे कठीण आहे. मात्र, वापर करताना जर विचार करून केला तर सदृढ समाजव्यवस्थेची हीच मीडिया वरदान ठरेल. कदाचित काही काळ वाट पहावी लागेल.
निलेश झालटे – 9822721292