सौभाग्य योजनेंतर्गत 100 टक्केविद्युतीकरण; 11 लाख घरांना वीजजोडणी

0

सर्वाधिक 1 लाख 48 हजार वीजजोडण्या पुणे जिल्ह्यात

पुणे : सौभाग्य योजनेंतर्गत राज्यात 100 टक्केविद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत 10 लाख 93 हजार 614 घरांना वीजजोडणी देण्यात आली आहे. सर्वाधिक 1 लाख 48 हजार वीजजोडण्या या पुणे जिल्ह्यात दिल्या आहेत.

‘पंतप्रधान सहज बिजली हर घर’ (सौभाग्य) या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ सप्टेंबर 2017 रोजी झाला होता. या योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने 31 डिसेंबर 2018 पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्‍चित केली होती. अशा सर्वच लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे.

वीजजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण

वीजजोडणी देण्यात आलेल्या एकूण 10 लाख 93 हजार 614 घरांपैकी महावितरणने पारंपरिक पद्धतीने 10 लाख 67 हजार 603 घरांना तर महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकारण (मेडा)द्वारे उर्वरित 26 हजार 11 लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. राज्यातील सर्वच 34 जिल्ह्यांत वीजजोडणीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. या योजनेंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत 100 टक्के वीजजोडणीचे दिलेले उद्दिष्ट महावितरणने 27 डिसेंबरलाच पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

34 जिल्ह्यांमध्ये वीजजोडणी

लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011 च्या सामाजिक आणि आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्‍चित करण्यात आली होती. संबंधित सर्व लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असल्याचे ’महावितरण’कडून सांगण्यात आले. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये वीजजोडणीचे काम पूर्ण झाले असून, सर्वाधिक एक लाख 48 हजार 264 वीजजोडण्या पुणे जिल्ह्यात देण्यात आलेल्या आहेत.

अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा

सौभाग्य योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात आले. हे शुल्क संबंधीत लाभार्थ्यांकडून त्यांच्या बिलातून 10 टप्प्यांत वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुद्धा मोफत वीजपुरवठा देण्यात आला आहे.