धुळे । सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांनी संगनमत करुन ग्रामसभेत कोणताही ठराव न करता व कोणतीही निविदा न काढता सातारा जिल्ह्यातील एका कंपनीकडून 32 सौरदिवे ज्यादा दराने खरेदी करुन भ्रष्टाचार केला आहे. शासकीय नियम धाब्यांवर बसवत बनावट बिलांव्दारे सौरदिवे खरेदी करुन सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी लाखो रुपये हडपले आहेत. देखभालीचा कोणताही करार न करता सौरदिवे, वाहतूक खर्च आणि फिटींग चार्जनुसार 19 हजार 750 रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. सोनगीरमध्ये लावण्यात आलेले 16 सौरदिवे हे सध्या नादुरूस्त अवस्थेत असून उर्वरित सौरदिवे बंद पडण्याच्या मार्गांवर आहेत. सौरदिवे खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोलचौकशी करुन सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांवर कठोर करावी, अशी मागणी सोनगीर(जि.धुळे) येथील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र तानाजी जाधव, शिवसेना पदाधिकारी दिनेश सुरेश देवरे, सामाजिक कार्यकर्ते निखिल राजेंद्र परदेशी,मनोहर चुनिलाल धनगर, संजय धोंडू चौधरी, शाम निंबा माळी यांच्यासह सोनगीर ग्रामस्थांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाधरण यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
बाजारभावापेक्षा जास्त भावाने खरेदी
सौरदिवे खरेदीसाठी ग्रामसभेत ठराव करुन घेणे गरजेचे होते. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी संगनमत करुन सौरदिवे बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केलेले आहेत. बाजारभावाप्रमाणे सौरदिवे अंदाजे 11 हजार रुपयांत खरेदी करता येतात. मात्र प्रत्यक्षात सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी 19 हजार 750 प्रमाणे 32 सौरदिवे खरेदी केलेले आहेत. यातून 8 हजार 750 प्रमाणे 32 नगांमधून सुमारे 2 लाख 80 हजार रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. सौरदिवे खरेदी करताना बिल नं.391, 391अ, 391ब अशी विभागणी केली असून बिलांवर तारीख दिलेली नाही. सौरदिवे कोणत्या प्रकारचे आहेत, त्याचा साधा उल्लेखही केलेला नाही. सौरदिवे खरेदीची ऑर्डर आणि डिलीव्हरी नोट दिल्याची तारीख नाही. सौरदिव्यांची खरेदी 10 महिन्यांपुर्वी करण्यात आलेली असून बिलांवर कोणतीही तारीख नाही. देखभालीचा कोणताही करार न करता सौरदिवे, वाहतूक खर्च आणि फिटींग चार्जनुसार 19 हजार 750 रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. सोनगीरमध्ये लावण्यात आलेले 16 सौरदिवे हे सध्या नादुस्त अवस्थेत असून उर्वरित सौरदिवे बंद पडण्याच्या मार्गांवर आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
सूट मिळविण्यासाठी कामाचे तुकडे
चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत सन 2015-16 आर्थिक वर्षाचे बेसिक ग्रँटचे अंतर्गत सोनगीर ग्रामपंचायतीला मिळालेल्या अनुदानातून सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी सरपंच व ग्रामसेवक या नावाने मे.ईक्ट्रा सोलर सिस्टीम, कोरेगाव(जि.सातारा) या कंपनीकडून विना ठराव व विना निविदा 19 हजार 750 प्रति नग प्रमाणे 32 नग 6 लाख 32 हजार रुपयांचे सौरदिवे खरेदी केलेले आहेत. मुल्यांच्या सर्व कामांसाठी 1 लाख व त्यापेक्षा अधिक रकमेच्या साहित्य खरेदीसाठी ई निविदा प्रणाली अवलंब करणे बंधनकारक आहे. तसेच साहित्य खरेदी करतांना 1 लाखापेक्षा कमी किंमत व्हावी व ई निविदा प्रक्रियेतून सूट मिळावी, यासाठी कामांचे तुकडे करुन खरेदी करता येणार नाही, असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने 27 मे 2015 रोजी प्रसिध्द केला आहे.
बनावट बिलाद्वारे खरेदी
सौरदिवे खरेदी करताना परिक्षण, देखभालीसाठी करार करुन घेणे बंधनकारक असूनही सोनगीर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी शासकीय नियम धाब्यावर बसविले आहेत. उत्पादनाशी संबंधित सहाय्यकारी सेवेबाबत कोणतेही करार मे ईलेक्ट्रा सोलर सिस्टीम या कंपनीशी केलेला नाही. तसेच बनावट बिलांमार्फत प्रति नग 19 हजार 750 प्रमाणे 32 नगांचे 6 लाख 32 हजार रुपये देवून खरेदी केली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.