सौर ऊर्जेच्या वापरासाठी ‘महावितरण’चे प्रयत्न

0

पुणे । राज्यात सौरऊर्जा अधिकाधिक वापरली जावी यासाठी आता राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या वर्षभरात राज्यात 1 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य असून राज्यातल्या 4 लाख शेतकर्‍यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. तसेच राज्यातील सर्व कृषिपंप हे टप्प्या टप्प्याने सौरऊर्जेवर आणण्याचे प्रयत्न असल्याची माहिती, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

वीजदरही कमी होतील
पुण्यात ऊर्जेचे संवर्धन व व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यातील विविध संस्थांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 12 व्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कृषीपंपांना दिवसा तसेच रात्री पुरेशी व स्वस्त वीज मिळावी ही शेतकर्‍यांची मागणी सौरऊर्जेच्या वापराने पूर्ण होईल असे बावनकुळे म्हणाले. सोबतच क्रॉस सबसीडी कमी झाल्याने प्रामुख्याने औद्योगिक वीजदर सुद्धा कमी होतील. कृषी पंपांसोबतच राज्यातील नळयोजना आणि उपसा जलसिंचन योजना संपूर्णपणे सौर ऊर्जेवर आणण्याची अंमलबजावणी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात कुठेही भारनियमन नाही
राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात सध्या कुठेही भारनियमन सुरू झाले नसल्याचे ऊर्जामंत्री बावनकुठे म्हणाले. आगामी काळात सर्व गावांना 24 तास अखंडीत वीज पुरवठा करण्याचे महवितरणचे उद्दिष्ट आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात 700 गावामध्ये शेती आणि गावासाठी एकच वीजवाहिनी वीज कंपनीकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतीसाठी वीज असतानाच या गावातील ग्रामस्थांना वीज उपलब्ध असते, ग्रामस्थांची ही गैरसोय दूर करण्यासाठी शेतीसाठी आणि गावासाठी अशा दोन वाहिन्या वेगळ्या वीजवाहिन्या करण्याचे प्रयत्न महावितरणकडून सुरू असल्याचे उर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. सध्या राज्याला जेवढ्या विजेची गरज आहे तेवढा कोळसा वीज कंपनीकडे उपलब्ध असल्याचे सांगत कोळश्याची कमतरता नाही, असे ऊर्जामंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.