पुणे । आजच्या पिढीवर प्रसारमाध्यमांचे अतिक्रमण झाले असून वृत्तपत्रातील बातम्या वाचून आपल्या मुलांचे भविष्य काय, याची काळजी प्रत्येक पालकांना सतावत आहे. शाळांमधील वातावरणदेखील मोठ्याप्रमाणात बदलले आहे. त्यामुळे मैदानावरील खेळांसह स्काऊटिंगसारख्या उपक्रमांतून मुलांची सर्वांगिण वाढ होणे गरजेचे आहे. स्काऊट शिक्षणातून शरीर, मनासह बुद्धीचीही उत्तम वाढ होते. त्यामुळे समाजात चांगली मूल्य रुजविण्याचे स्काऊट चळवळीचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांनी केले.
विविध स्पर्धांचा कुलसप्ताह
सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट-गाईड खुल्या पथकाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध स्पर्धांच्या कुलसप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ वझे यांच्या हस्ते पार पडला. पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमाला कुलाच्या सहाय्यक कुलमुख्य श्रेया मराठे, पुष्कर भराडिया, कुलसप्ताह समितीप्रमुख शिवाजी रोडे, श्रावणी कदम, केतकी विपट, ॠषिकेश खाडे यांसह अधिकारी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुलांवर संस्कार करणे हे कर्तव्य
माधव वझे म्हणाले, आपण समाजाचे घटक व जबाबदार नागरिक आहोत, ही जाणीव लहानपणापासून मुलांमध्ये रुजवायला हवी. घर आणि शाळा वा संस्था या प्रत्येक मुलाच्या सर्वांगिण वाढीची केंद्र आहेत. त्यामुळे त्यांची योग्य निवड करणे, ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे. शाळेमध्ये पालक म्हणून आणि घरामध्ये शिक्षक म्हणून मुलांवर संस्कार करणे, हे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. स्काऊट शिक्षण देणा-या संस्था या मुलांना संस्कारित करीत असल्याचे चित्र समाजासाठी आशादायी असल्याचे त्यांनी सांगितले. केतकी विपट हिने सूत्रसंचालन केले.