पुणे । केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅन्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे निश्चित होत आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ही संस्था औरंगाबादला जाणार असल्याच्या वृत्तावर पडदा पडला.मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत काही वर्षांपासून देशभरात विविध ठिकाणी स्कूल ऑफ प्लॅनिंग ऍन्ड आर्किटेक्चर’ची उभारणी करण्याचे धोरण आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्येही या संस्था सुरू करण्याचे नियोजन होते. त्याद्वारे आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही संस्था पुण्यात सुरू करण्याबाबत केंद्र सरकारला 17 जुलै 2013 रोजी प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी 13 एकर जागा देण्याबाबतही अनुकूलता दर्शविली होती. मात्र, त्यानंतर आतापर्यंत पुण्यात संस्था सुरू करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच युती सरकार आल्यानंतर ही संस्था पुण्यातून औरंगाबादला हलविण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.
संस्थेसाठी जागा प्रस्तावीत
मात्र, या क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्रित येत ही संस्था पुण्यातच सुरू करण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला. औरंगाबादपेक्षा पुणे हे संस्थेसाठी ठिकाण योग्य असल्याचे तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी ही संस्था पुण्यातच सुरू करण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे पाठपुरावा केला. संस्थेसाठी जागाही प्रस्तावित आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने स्कूल ऑफ प्लॅनिंगची नितांत गरज आहे. त्यामुळे राज्याचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हब असलेल्या पुण्यात ही संस्था उभारावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले. दरम्यान, स्मार्ट सिटीसारखी योजना प्रत्यक्षात येत असताना देशात सध्या नगर रचना क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. नगररचनाकारांची सध्याची गरज लक्षात घेवून ही संस्था तातडीने होणे आवश्यक असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.