डॉ. एन. एस. उमराणी यांचे प्रतिपादन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपक्रमांतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद
चिंचवड : स्टार्ट अप इंडियाव्दारे विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसायाच्या कल्पना प्रत्यक्ष साकार करता येतील, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले. चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज आयोजीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपक्रमांतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते विद्यार्थ्याना भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्टार्ट अपचे महत्व आणि स्थान या विषयावर बोलत होते. संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, विभाग प्रमुख डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. अनामिका घोष, प्रा. रसीका पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
देशात बेरोजगारीचे आव्हाणे…
हे देखील वाचा
डॉ. उमराणी पुढे म्हणाले, आपल्या देशात बाजारपेठ उपलब्ध असून शिक्षण घेऊन नोकरी करण्यात विशेष रूची नसणार्यांनी स्टार्ट अपव्दारे व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करावे. आज देशभरात 30 हजार विविध शाखाची महाविद्यालये आहेत. 850 विद्यापीठे आहेत. शहरी व ग्रामीण भागात भौगोलिक परिस्थितीनुसार विविध प्रकारची आव्हाने देखील भरपूर आहेत. देशभरात सुमारे 78 टक्के युवक, युवती उच्च शिक्षणापासून वंचित अन् त्यात बेरोजगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे. विद्यापीठ व महाविद्यालये हे चांगले विद्यार्थी, उत्तम ज्ञान देणारे व्यासपीठ आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर टाकण्याचा सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहे.
व्यवसायावर भर द्या..
वाढत्या बेरोजगारीला आळा बसावा, विद्यार्थ्यांनी नोकरी ऐवजी स्वत:चा व्यवसाय करावा, यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी युवकांच्या कल्पनाना साकार करता यावे. स्वत:च्या पायावर उभे राहता यावे. वस्तू निर्मिती क्षेत्रातील उद्योजकांना अत्यावश्यक पूरक सेवा, इतर वस्तू निर्माण करता याव्या. भारतीय अर्थ व्यवस्था सुधार व्हावा, यासाठी स्टार्टअप इंडिया सुरू केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञान आत्मसात करून व्यवस्थापन, नवीन कल्पना साकार करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नोकरीवर अवलंबून न राहता मनातील इच्छीत व्यावसायिक होण्याचे स्वप्न साकार करताना गुणवत्ता बाजारपेठेचे ज्ञान अवगत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विविध विषयांवर मार्गदर्शन..
प्रतिभा महाविद्यालय विविधस्तरावर विद्यार्थी केंद्रीत ठेवून नव नवे उपक्रमे यशस्वीरीत्या पार पाडत आहे. याचे उपकुलगुरू डॉ. उमराणी यांनी कौतूक केले. या पूर्ण वेळ दोन दिवसीय परीसंवादामध्ये ब्रिजमोहन शर्मा, मनीष जैन, डॉ. अनिल खंदारे, डॉ. के. एन. बवले, डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी विद्यार्थ्याना विविध विषयावर मार्गदर्शन केले. परिसंवादाची प्रस्तावना व स्वागत संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. जयश्री. मुळे यांनी मानले.