स्टीव्ह वॉचा मुलगा मैदान गाजवण्यास झाला सज्ज

0

दुबई । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी आतापर्यंत वर्ल्ड कपमधील चमकदार कामगिरीच्या आधारे आपले नाव कोरून ठेवले आहे. याच क्रिकेटपटूंची पुढची पिढी आता 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. पुढील वर्षी होणार्‍या अंडर-19 वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ऑस्टिन वॉ, ठँडो एन्टीनी यांसारखे उदयोन्मुख खेळाडू आपापल्या संघांचे प्रतिनिधित्व करतील. ऑस्टिन हा ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांचा मुलगा आहे. 2016 साली झालेल्या ऑस्ट्रेलियातील 17 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत नाबाद 122 धावा करून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

ऑस्टिनची शैली भारतीय संघातील स्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याशी मिळतीजुळती असून दिवंगत फिल ह्युजेस हा त्याचा आवडता खेळाडू आहे. पुढील वर्षी 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडमध्ये होणारा अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. या स्पर्धेत मला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.

त्यामुळे माझ्या क्षमतेचा पुरेपूर लाभ संघाला व्हावा, असा माझा प्रयत्न आहे, असे ऑस्टिन सांगतो. ठँडो हा दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टीनी यांचा मुलगा आहे. तो डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने वेगवान गोलंदाजीही करतो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माझ्या खेळामध्ये खूप फरक असला, तरी आमच्या क्रिकेटविषयीच्या दृष्टिकोनामध्ये साधर्म्य आहे, असे तो सांगतो.