चेंडू कुरतडल्याचे प्रकरण : मागितली जाहीर माफी
सिडनी : चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाची टीका सहन करणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ गुरुवारी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आला. मी पुरता उद्ध्वस्त झालो आहे, ही चूक मी आयुष्यभर विसरणार नाही. काळ हा सगळ्यावर औषध असतो. वेळेबरोबर क्रीडाप्रेमी माझा हा अपराध पोटात घेतील आणि पुन्हा एकदा मी ताठ मानेने जगू शकेन, अशी आशा त्याने मीडियाच्या कॅमेर्यासमोरच अक्षरश: ढसाढसा रडत व्यक्त केली. रडत रडतच त्याने आपल्या कृत्याबद्दल माफीदेखील मागितली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातली बंदी
सिडनी येथे पत्रकार परिषद घेऊन स्मिथने संपूर्ण प्रकारावर भाष्य केले. तो म्हणाला, मी कोणालाही दोष देणार नाही. मी संघाचा कर्णधार होतो. जे काही झाले ती माझी जबाबदारी होती आणि ती मी स्वीकारतो. माझ्या नेतृत्वाचे ते अपयश आहे. माझे वर्तन पूर्णपणे चुकीचे होते. आता त्याचा पश्चात्ताप होत आहे. माझे संघ सहकारी, क्रिकेटवर प्रेम करणार्या जगातील सर्व क्रीडाप्रेमींची मी माफी मागतो. मला माफ करा, अशी गयावया स्मिथने केली. केपटाऊन टेस्टमध्ये चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एक वर्षांची तर कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात कोच डॅरेन लेहमनला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने क्लीनचीट दिली आहे.