मुंबई : गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान पुतळ्याच्या खाली देश-विदेशातील भाषांमध्ये नाव लिहिण्यात आले आहे. मात्र या पाटीवर मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे. जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली. तसेच लोकार्पण सोहळ्यावेळी छत्रपती शिवरायांचे नाव घेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये शिवरायांचे शौर्य होते, असा उल्लेख मोदी यांनी केला. परंतु पुतळ्याच्या खाली मराठी भाषेत नाव लिहिण्यात आलेले नाही.
पाटीमध्ये हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ गुजरातीसह रशियन, फ्रेंच आणि चीनच्या भाषांचाही समावेश आहे. मात्र, शेजारच्या राज्यातील मराठी भाषेचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या पाटीमध्ये तमिळ आणि बंगाली भाषेतील नाव चुकले आहे. या पाटीवर एकूण 10 भाषा आहेत.
केवडीया येथे नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असे या पुतळ्याचे वर्णन मोदी यांनी करताना शिवरायांशी तुलना केली. मात्र, गुजरातला मराठीचे वावडे असल्याचे दिसत आहे. हा पुतळा मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे.