स्टॅच्यू ऑफ युनिटी : मोर्चा काढणाच्या तयारीत असलेल्या १६ जणांना अटक

0

अहमदाबाद : स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पणाच्या निषेधार्थ मोर्चा काढणाच्या तयारीत असलेल्या १६ आदिवासी नेत्यांना मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी आदिवासींच्या जमिनी सरकारने हडपून त्यांच्यावर अन्याय केल्याचा या सर्व नेत्यांनी आरोप केला आहे.

गुजरातच्या १९ जिल्ह्यांमध्ये भिलीस्तान ट्रायबल सेना आणि भारतीय ट्रायबल पार्टी या दोन संघटनांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या लोकार्पण सोहळ्याच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी केली होती. गुजरातमधील अनेक आदिवासी गावांमध्ये आज चुल्हा बंद आंदोलन केलं जाणार होतं. ‘सरदार पटेलांना आमचा कोणताच विरोध नाही. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमानच आहे. पण गोरगरीब आदिवासींच्या जमिनी घेऊन भाजप जे राजकारण करते आहे त्याला आमचा विरोध आहे. या पुतळ्यामुळे साधू बेटावरील आदिवासींना काय फायदा होणार आहे हे फक्त मोदींनी सांगावं,’ असा सवाल या संघटनांकडून करण्यात आला आहे. ऐन उद्घाटन सोहळ्यात या संघटनांनी काही गदारोळ घालू नये म्हणून त्यांच्या नेत्यांना मंगळवारी संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले.