जळगाव । जळगावकडे येणार्या ट्रॅव्हल्सचा स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे समोरुन येणार्या ट्रकवर आदळली. या झालेल्या अपघातात दोघां चालकासह 10 प्रवासी जखमी झालेत. ही घटना औरंगाबाद राज्यमार्गावर चिंचोली व उमाळ्याच्या दरम्यान सकाळी 11 वाजता घडली. यातील जखमींवर जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर काहींना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी
जळगाव शहरातून फत्तेपूर येथे मका भरण्यासाठी भगवती रोडलाईन्सचा रिकामा ट्रक (जीजे 10 व्ही 9828) निघाला होता. त्याचवेळी जामनेर येथील बेदमुथा ट्रॅव्हल्स तेथील मजूर व कर्मचार्यांना घेऊन जळगावकडे येत होती. उमाळा फाटा येथून काही अंतर पुढे येताच ट्रॅव्हल्सचा स्टेअरींग रॉड तुटला. स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे ट्रॅव्हल्स वळवणे चालकाला शक्य झाले नाही. त्यामुळे वळणावर समोरून येणार्या ट्रकवर ट्रॅव्हल्स आदळली. दोघा वाहनांची गती कमी असल्यामुळे सौम्य धडक झाली. मात्र ट्रॅव्हल्सचालक कैलास रामलाल जाधव (वय 50, रा.खादगाव, ता.जामनेर) व ट्रकचालक भिकुभाई अब्दुलभाई काछेला (वय 55, रा.महुआ, गुजरात) हे दोघे जखमी झाले. काछेला यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली दुखापत झाली. तर जाधव यांचा उजवा पायाचा पंजाला दुखापत झाली. या शिवाय ट्रकचा क्लिनर मनसुखसह ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणारे दहा जण किरकोळ जखमी झालेत. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले होते. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ट्रॅव्हल्सचालक जाधव हे स्टेअरींग व पतर्यामध्ये तासभर अडकुन पडले होते.
ट्रॅव्हल्स नागरिकांच्या मदतीने केली बाजुला
अपघातामुळे ट्रॅव्हल्स रस्त्यात आडवी थांबल्याने दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी पोलिसांनी गावरकर्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. तत्पूर्वी रस्त्याच्या मधोमध असलेली ट्रॅव्हल्स सुमारे 100 नागरीकांनी ढकलुन बाजुला केली. अपघातामुळे ट्रॅव्हलसचे गियर अडकलेले होते. ते देखील नागरीकांनी कॅबीमध्ये जऊन सुरळीत केले.