पिंपरी-चिंचवड : एटीएमकार्डची अदलाबदल करणे, एटीएम फोडणे, एटीएमचे डमी कार्ड वापरुन खात्यावरून पैसे गायब करणे अशा प्रकारच्या अनेक चोर्या घडल्याचे ऐकले आहे. पण एटीएम मधून पैसे बाहेर आल्यानंतरही व्यवहार अपूर्ण झाल्याची ऑनलाइन तक्रार नोंदवून बँकेकडून पुन्हा पैसे उकळण्याचा नवीन फंडा आता चोरटयांनी अवलंबल्याचे आढळून आले आहे. या प्रकारातून 18 दिवसात चोरटयांनी पिंपरीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाला तब्बल दोन लाखांचा गंडा घातला आहे. पिंपरी शाखेच्या बाहेरील एटीएम हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जयश्री अय्यर (वय 43, रा. रहाटणी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र ही फसवणूक करणारा नेमका कोण? हे कळू न शकल्याने अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांची चोरी करण्याची अजब युक्ती पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
तब्बल 18 वेळा गंडा
चोरटे कार्ड द्वारे पैसे काढण्यासाठी पिंपरी शाखेच्या बाहेरील एटीएममध्ये यायचे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मशिनमधून पैसे बाहेर आले की त्वरित एटीएम मशीनचा विद्युत प्रवाह खंडित करायचा. पैसे काढून घ्यायचे आणि पुन्हा विद्युत प्रवाह पूर्ववत चालू करायचा. यामध्ये खातेदाराला तांत्रिक अडचणीमुळे व्यवहार झाला नाही, असे एटीएम स्क्रीनवर दाखविण्यात आले की, त्यानंतर बँकेकडे पैसे न मिळाल्याची ऑनलाईन तक्रार दाखल करून पुन्हा बँकेकडून खात्यावर पैसे जमा करवून घ्यायचे. असा प्रकार चोरटयांनी 3 जून 2017 ते 17 ऑगस्ट 2017 या कालावधीत 18 वेळा अशा पद्धतीने बँकेकडून तब्बल एक लाख 90 हजार रुपये उकळले.
फसवणूक नेमकी कोणाकडून?
याबाबत ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना भोसरीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी सांगितले, की शहरातील ही पहिलीच तक्रार आहे. यामध्ये खातेदारच फसवणूक करीत आहे की, बनावट नावाने खाते उघडून हा प्रकार केला जात आहे, चोरटे परराज्यातील आहेत का, अशी बरीच गुंतागुंत या प्रकरणात असल्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण प्राथमिक माहितीनुसार अमरावती, पिंपरी येथील एसबीआयच्या पाच तर अॅक्सीस बँकेच्या एक अशा सहा शाखातून ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हे रॅकेट थेट परराज्यातूनही चालवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास आरोपी कोण हे ठरवणे कठीण आहे.
बँकांचाही निष्काळजीपणा कारणीभूत
या प्रकरणात तपास करत असताना बँकांनीही केवायसी (नो टू युवर कस्टमर) अर्थात खातेदाराची सर्व माहिती व पुरावे बँकाकडे घेणे गरजेचे आहे. मात्र खोटे पुरावे किंवा कोणतीही कागदपत्र न देता अनेक खाती आजही बँकामध्ये सुरु आहेत. ज्याचा फायदा गुन्हेगारांना होत असून पोलीस तापासासाठी ही मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे खातेदारांनीही सुरक्षा म्हणून आपली सर्व माहिती, ओळखपत्रे आदी बँकेत वेळेत जमा करावीत व बँकानीही खातेदरांना वेळोवेळी त्याची आठवण करुन द्यावी असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.