स्टेडियम रिकामी राहण्याची भीती

0

नवी दिल्ली । देशात 6 ऑक्टोबरपासून रंगणार्‍या 17 वर्ष गटाच्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेचा विजयी चषक सध्या देशाटनावर आहे. स्पर्धेसाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी देशातील निरनिराळ्या शहरांमध्ये हा चषक लोकांना पाहण्यासाठी ठेवला जात आहे. देशातील सहा शहरांमध्ये स्पर्धेचे सामने रंगणार असून त्यात 24 देशांचे युवा फुटबॉलपटू आपला सर्वोत्तम खेळ सादर करणार आहेत. भारतात पहिल्यांदाच अव्वल दर्जाच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होत असून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्याच्या कार्याकालात होत असलेली ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे. त्यामुळेच माजी क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्यानंतर क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोेड स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध 6 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सामना बघण्यासाठी दर्शकांमध्ये उपस्थित राहणार आहेत. पण आता आयोजकांसमोर एक मोठी समस्या उभी राहीली आहे.

समस्या ही आहे की, या सामन्यांच्या तिकीटविक्रीला दिल्लीकरांनी म्हणावा तसा प्रतिसादच दिलेला नाही. आयोजक आणि क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 सप्टेंबरपर्यंत या सामन्याची केवळ 15 तिकीटे ऑनलाईन विकली गेली होती. जवाहरला नेहरु स्टेडियमच्या गॅलरीची क्शमता 58,000 दर्शकांची आहे. त्यामुळे तिकिटे विकली गेली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर स्टेडियम रिकामे राहिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्येवर तोडगा काढताना आयोजकांनी आता मोफत तिकीटे वाटण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यासांठी 28,750 तिकीटे मोफत वाटण्यात येणार आहे. सामने बघण्यासाठी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी तिकीटासोबत एक टी शर्टही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय या विद्यार्थ्याना स्टेडियममध्ये आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने बसेसची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेवर लक्श ठेवण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने विशेष अधिकारी नेमले आहेत.तिकीट विक्रीची ही खराब परिस्थिती केवळ पहिल्याच सामन्यापुरता आहे असे नाही. दिल्लीत होणार्‍या भारताच्या इतर दोन सामन्यांच्याबाबतीतही अशीच परिस्थिती आहे. यातील पहिल्या सामन्याची सात हजार आणि दुसर्‍या सामन्याची पाच हजार तिकिटेच विकली गेली आहेत. त्यामुळे या दोन्ही सामन्यांच्या वेळीसही 22,250 तिकीटे विद्यार्थ्यांमध्ये वाटली जाणार आहेत.

17 वर्षे गटाच्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेत आतापर्यंत नायजेरीयाचा संघ सर्वात जास्त यशस्वी ठरला. नायजेरीयाने आतापर्यंत पाचवेळा (1985, 1993, 2007, 2013, 2015) विजेतेपद मिळवले आहे. याशिवाय तीन वेळा ( 1987, 1999, 2003) नायजेरीयाचा संघ उपविजेता ठरला आहे. मात्र भारतात होणार्‍या स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरलेला नाही. ब्राझिलने 1997, 1999, 2003 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. याशिवाय घाना (1991, 1995), मेक्सिको (2005, 2011) दोन वेळा विजेते ठरले आहेत. विघटन व्हायच्याआधी सोव्हिएत युनियन( 1987), सौदी अरेबिया (1989), फ्रांस(2001) आणि स्वित्झर्लंडने (2009) एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. घानाच्या संघा सलग चार वेळा (1991, 1993, 1995, 1997) स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यातील 1991 आणि 1995 मध्ये त्यांनी स्पर्धा जिंकली. मेक्सिको आणि उरूग्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी 98,943 फुटबॉलप्रेमींनी हजेरी लावली होती. युएईमध्ये 2013 मध्ये खेळल्या गेलेल्या या विश्‍वचषक स्पर्धेत सर्वात जास्त गोल करण्यात आले. त्यावेळी स्पर्धेतील 52 सामन्यांमध्ये 172 गोल करण्यात आले.

24 देश भिडणार
फिफा 17 वर्ष गटाच्या विश्‍वचषक स्पर्धेत 1985 ते 2005 पर्यंत सहभागी 16 संघाची चार गटात विभागणी केली जायची. 2007 नंतर सहभागी देशांची संख्या 24 करण्यात आली. या विश्‍वचषक स्पर्धेचे पहिले वर्ष सोडल्यास 1987, 1989 आणि 2007 मध्ये सात देशांचे संघ पहिल्यांदाच स्पर्धेत खेळले होते. अमेरिका आणि ब्राझिलने आतापर्यंत सर्वाधिक 15 वेळा या स्पर्धेत भाग घेतला आहे. या दोन्ही देशांची ही 16 वी स्पर्धा आहे. या स्पर्धेत खेळणारा भारत हा आशियातील 18 वा देश आहे.

आशियाला पाचव्यांदा यजमानपद
इतर उपखंडांच्या तुलनेत आशिया खंडात ही स्पर्धा सर्वाधिक वेळा खेळवण्यात आली आहे. भारतात होणारी ही आशियात खेळली जाणारी पाचवी स्पर्धा आहे. याआधी चीन (1985), जपान (1993), दक्शिण कोरिया (2007) आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये (2013) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

खेळांडूसाठी खास आहे स्पर्धा
17 वर्ष गटाच्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेत खेळलेल्या 12 खेळाडूंनी मुख्य फिफा विश्‍वचषक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 17 वर्ष गटाचा आणि मुख्य फिफा विश्‍वचषक जिंकणारा ब्राझिलचा रोनाल्डिन्हो हा एकमेव खेळाडू आहे. याशिवाय तिन असे खेळाडू आहेत की ज्यांनी या दोन्ही विश्‍वचषक स्पर्धांच्या अंतिम फेरीत गोल केले आहेत. त्यात मारितो गेट्त्झे (2014), एमॅन्युअल पेटिट (1998) आणि आंद्रेस इनिएस्ताचा (2010) समावेश आहे. 17 वर्ष गट आणि मुख्य विश्‍वचषक स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंमध्ये स्पेनचा इकर कॅसिलास हा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या कर्णधारपदाखाली संघाने विश्‍वविजेतेपद मिळवले आहे.

फिफाने परवानगी नाकारली
या विश्‍वचषक स्पर्धेच्या आयोजनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या स्वारस्यामुळे क्रीडा मंत्रालयही खूप सक्रिय झाले आहे. क्रीडा मंत्रालयाने याआधी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या रकमेची तरतुद केली होती. याशिवाय अर्जेटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना आणि रेआल माद्रिद, पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला बोलवण्याचे ठरवले होते. पण फिफाच्या प्रमुखांनी मनाई केल्यावर उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम बारगळला. फिफाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या कुठल्याही स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होत नाही. मात्र भारताने उद्घाटन समारंभाचा आग्रह धरल्यावर त्यावर खर्च होणारी रक्कमी खेळाच्या विकासासाठी वापरावी असे सांगण्यात आले होते.