स्त्रियांनी लैंगिक छळाविरुद्ध एल्गार करावा!

0

स्त्रियांना आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीचे स्थान मिळालेले आहे. ज्या स्त्रीला घराचा उंबरठा ओलांडण्याची अनुमती नव्हती, ती स्त्री आज आपल्या कर्तृत्वानी पुरुषालासुद्धा काही क्षेत्रात मागे सोडताना दिसून येत आहे. पण स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात झेप घेत असली, तरीही तिला अनेक अडचणींना आताही सामोरे जावे लागत आहे. हे आपल्याला नाकारता येत नाही हेही तितकंच खरं. प्राचीन काळापासून स्त्रीला एक भोग वस्तू म्हणून पाहिले जात होते. पुरुष प्रधान संस्कृतीत तिचा आण्विक छळ होत गेला. मनुस्मृतीमध्ये तिला उपभोगाचे साधन समजल्या गेले, काहींनी ती अध्यात्म मार्गातील धोंड वाटली, तर काहींना तिला धूर्त, लोभी, कपटी व चारित्र्यहीन म्हणून कायम तिची अवेहलना केली. अशाप्रकारे सुरुवातीपासूनच तिचा मानसिक, शारीरिक व भावनिक छळच होत गेलेला दिसून येतो आणि आजही आपण आधुनिक युगात वावरत असताना स्त्रीची अवहेलना होतच आहे. लैंगिक अत्याचार, विनयभंग, बलात्काराचे प्रकार रोजच घडत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी आपण जागृत झाले पाहिजे, ही आज काळाची गरज आहे. समाजात वावरत असताना कामाच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याने चालताना, रेल्वे व बसमध्ये प्रवास करताना सतत तिला लैंगिक छळाला सामोरे जावे लागत आहे. अशा कित्येक महिला ज्या रोज प्रवास करतात त्यांना बसमध्ये, ट्रेनमध्ये गर्दीच्या ठिकाणी पुरुषाचा विकृत स्पर्श सहन करावा लागतो.

अश्‍लील हावभाव करणे, मोबाइलद्वारे अश्‍लील संदेश पाठवणे अशा कितीतरी समस्यांना महिला आजही सामोरे जात आहेत आणि खंत ही की फक्त 10% महिलाच याविरुद्ध तक्रार करताना दिसून येतात, तर 90% महिला हा छळ मुकाट्याने सहन करतात. समाजातील सहकार्याची कमतरता, घरच्या लोकांशी न साधलेला मुक्तसंवाद तर महत्त्वाचे कारण म्हणजे स्वत:च्या बदनामीची भीती होय. परंतु, जोपर्यंत आपण समाजातील या वाईट मनोवृत्तीचा विरोध करणार नाही तोपर्यंत यांचीच परिणती म्हणजे समाजात वाढत चाललेले स्त्रियांवरील अत्याचार कमी होणार नाही हे नक्की! तेव्हा महिलांनी आता गरज आहे ती लैंगिक छळाविरुध्द आवाज उठवण्याची, स्वत:मध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून या वाईट मनोवृत्तीच्या सापांना ठेचण्याची, सार्वजनिक ठिकाणी लैंगिक छळाविरुद्ध आवाज बुलंद करण्याची, अशा वासनाधीन लोकांना अद्दल घडवण्यासाठी तिने पेटून उठले पाहिजे, स्वत:ला विरोध करण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे. लैंगिक छळाविषयी आई-वडिलांनी मुलींसोबत मुक्तसंवाद साधने गरजेचे आहे. मुली शिक्षणासाठी प्रवास करत असताना त्यांना असे अनेक वाईट प्रसंग येत असतात. परंतु, घरच्यांना ती सांगू शकत नाही. ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर आपले शिक्षण कायमचे बंद तर होणार नाही ना? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे ती घरच्यांना ही गोष्ट सांगत नाही. तेव्हा आई वडिलांनी आपल्या मुलींना विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधने काळाची गरज आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबईला कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणार्थ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण )अधिनियम 2013च्या अंमलबजावणीनुसार जनजागृती अभियानामार्फत अनेक महाविद्यालयांत आयसीसी नऊ लोकांची कमिटी स्थापन केली आहे. लैंगिक छळाविषयी माहिती व दक्षता कशी घेतली पाहिजे याबद्दलची कार्यशाळा घेऊन मुलींना जागृत करण्याची मोहीम राबवली जात आहे. तिची छेडखानी करणे हे कुठे तरी थांबायला पाहिजे, तेव्हा लैंगिक छळाविरुद्ध महिलांनी सजग होऊन एल्गार व निषेध करावा.

– प्रा. वैशाली देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
7420850376