स्त्रियांनी सन्मानाने जगायला शिकायला हवे

0

भुसावळ : महिला शिक्षणासाठी जीवाचे रान करणार्‍या सावित्रीबाई फुलेंच्या जीवन चरित्रातील विविध प्रसंगांवरून त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा लक्षात येतो. त्यांनी दाखविलेल्या मार्गानुसार आजची स्त्री शिकली व तिने प्रगती केली. याचबरोबर स्त्रीयांनी सन्मानाने जगायलाही शिकावे, असे आवाहन तहसीलदार मीनाक्षी राठोड यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात केले.

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम
येथील द.शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंतर्नादतर्फे लेकींचा गौरव कार्यक्रम पार पडला. यावेळी शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका खैरनार, मुख्याध्यापिका राजश्री सपकाळे व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केलेली दिपाली सोनार ही विद्यार्थीनी व्यासपीठावर उपस्थित होते.

गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप
प्रास्ताविकात अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. खुशबू जंगले, रवीना वानखेडे व नेहा कपाटे या मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली. त्यानंतर गरीब, होतकरू व हुशार मुलींना गणवेश, दप्तर व वाचनीय पुस्तकांचे वाटप करण्यात येवून सावित्रीच्या लेकींचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन नेहा कपाटे हिने तर आभार वैष्णवी खाचणे हिने मानले. यशस्वीतेसाठी ज्ञानेश्‍वर घुले, डॉ. जगदीश पाटील, प्रा. श्याम दुसाने, विनोद पाठक, प्रभाकर नेहेते, अतुल चौधरी, राकेश कोल्हे, प्रमोद पाटील, रविंद्र पाटील, मिलींद चौधरी, योगेंद्र चौधरी, आशिष तडवी, सुनिल पाटील, कमल चौधरी यांनी परिश्रम घेतले.

एकांकीतेतून दिला सावित्रीमाईंचा संदेश
येथील हिंदी सेवा मंडळ संचलित र.नं. मेहता प्राथमिक विद्या मंदिरातील उपशिक्षिका वैशाली चौधरी यांनी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून वेशभूषेसह त्यांचा सामाजिक संदेश एकांकिकेतून दिला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अंजना शर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून रिता शर्मा उपस्थित होत्या. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा अभियानाची सुरूवात करण्यात आली. शाळेतील शिक्षिका व कन्यारत्नप्राप्त पालकांचा सत्कार करण्यात आला. उपशिक्षिका वैशाली चौधरी यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा धारण करून त्यांच्या जीवनचरित्रावर एकांकिका सादर केली. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. इंग्रमी माध्यम प्रमुख रिता शर्मा व दीपक कुळकर्णी यांनी स्त्रीयांचे आधुनिक जगातील स्थान पटवून दिले. त्यानंतर मुली व पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेते सुनिता राजेंद्र जैन व उपविजेते शमीना रफिक बागवान यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन शीतल इंगळे यांनी तर आभार प्रतिभा आमोदेकर यांनी केले.

नाहाटा महाविद्यालयात नाट्यपुस्तकाचे प्रकाशन
म्युनिसिपल हायस्कूलमधील उपशिक्षिका सीमा भारंबे बोरोले लिखीत ‘रूक्मिणी ः एक समर्पित जीवन’ या नाट्यपुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून नाहाटा महाविद्यालयात करण्यात आाले. अध्यक्षस्थानी मोहन फालक तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे, विष्णू चौधरी, नाट्यकर्मी विरेंद्र पाटील व अनिल कोष्टी, डॉ. आशालता महाजन, प्रमुख वक्ते डॉ. के.के. अहिरे यांची उपस्थिती होती. समीक्षक डॉ. अहिरे म्हणाले की, साहित्यातून समाजाचे दर्शन घडत असते. वेदनेतून निर्माण झालेले साहित्य समाजाला प्रेरक ठरते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाला विमलबाई बोरोले, प्रमिला भारंबे, संजय भारंबे, मंजुषा भारंबे, सुनिता भारंबे, ज्ञानेश्‍वर घुले, संदीप पाटील, नारायण माळी आदी उपस्थित होते.