स्त्रियांवरील अत्याचार व सामाजिक भान

0

मुंबई व उपनगर तसेच पुणे परिसरात महिलांच्या छेडछाडी व विनयभंगाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबई व उपनगरात दाट लोकवस्ती आहे. रात्रीच्या वेळी छेडछाडीचे प्राण वाढले असून, मुली, महिला असुरक्षित आहेत. मुंबईत रेल्वे लोकल गाड्यांमध्ये जास्त प्रमाणात छेडछाडीचे प्रकार घडतात, तर रिक्षांमधून प्रवास करताना अनेक महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागल्याचे दिसत आहेत. समाजात अजूनही स्त्रियांना हीन मानले जाते, असे विविध घटनांवरून दिसत आहे. काळ बदलला, लोक डिजिटल वस्तू वापरू लागले. परंतु, लोकांच्या मन आणि मेंदूतील जुनाट रुढी, स्त्रियांबद्दलची हीन भावना अजूनही नष्ट झालेल्या नाहीत. या रानटी मानसिक अवस्थेचे काय करायचे, हा समाज विवेकवादाकडे कसा वळवायचा, असा मोठा प्रश्‍न मानसोपचार तज्ज्ञ व समाजातील धुरिणांना पडला आहे. ज्या देशात स्त्रियांना प्रथम दर्जा दिला जात होता, त्या देशातच आता लिंगपिसाट नराधमांनी हैदोस घातला आहे.

न्याय व्यवस्था व संरक्षण व्यवस्थेने याबाबतीत कडक धोरण ठेवले, तर या घटना रोखता येतील. समाजात लोक शिक्षित झाले. परंतु, सुसंस्कारित झाले नाहीत तर तो समाज मृतवत व आंधळा आहे, असे समजले जाते. आम्ही हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतो, वर्तमानपत्रात वाचतो. परंतु, संवेदनशीलता आमच्या अंतरी तसूभरही शिल्लक राहिली नाही काय, असा प्रश्‍न सतावत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील धायरी येथे अल्पवयीन बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी त्या नराधमास अटक झाली, न्यायदेवतेकडून शिक्षाही होईल. परंतु समाजात ही चाललेली अधोगती थांबवण्यासाठी सामाजिक संघटना, पोलीस दल, समाजातील जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरण गाजले होते, त्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीत मोठ्या संख्येने या प्रकारचा निषेध करण्यासाठी असंख्य निर्भया एकत्र आल्या होत्या. कोपर्डी येथे एका बालिकेवर काही नराधमांनी अत्याचार केला, त्यावेळी राज्यातील मराठा समाजासह सर्व नागरिक एकत्र आले आणि त्यांनी भव्य मोर्चा काढून निषेध नोंदवला. पण पुढे काय? समाजातील काही नराधम अत्याचार करतात, प्रसंगी मुली, महिलांची हत्या करतात. हे सर्व थांबवणार कसे? समाज सुसंस्कारित होण्यासाठी आम्ही कुठे कमी पडत आहोत की टीव्ही, वेबसाइटचे आक्रमण आम्ही रोखण्यास कमी पडत आहोत काय, असा प्रश्‍न पडतो. या डिजिटल युगात समाजावर पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे. त्यातील चांगले ते घ्यावे, हीन ते सोडून द्यावे, असे न करता आम्ही विकृतीच्या मागे लागत आहोत. जेव्हा लोकांना राहणे, खाणे व जगणे असुरक्षित वाटते, तेव्हा लोकांचे वर्तन व स्वभाव बदलत असतो. या बदलाला सर्वजण सामोरे जात नाहीत. काही जणांवर त्याचा विकृत परिणाम होतो. अत्याचार करण्यामागे व्यक्तीच्या मनातील दूषित भाव उफाळून येणे हे एक मानसिक कारण असते. काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. स्वतःच्या चंगळवादासाठी काहीही करण्याच्या हट्टापायी अशी नीच कृत्ये घडली जातात.

मुंबईमध्ये लोकलच्या डब्यात रात्रीच्या वेळी काही जण महिलांशी गैरवर्तन करतात, अशावेळी काही महिला मुलींनी चालत्या लोकल ट्रेनबाहेर उड्या मारल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. सद्यःस्थितीत काही बेरोजगार टवाळखोर तरुण एकत्र येतात. निराश मनोवस्थेत ते एखादी मुलगी किंवा महिलेला लक्ष्य करतात. अशाप्रकारे एकत्र येऊन अत्याचार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. मुलुंडमध्ये कायद्याचा रक्षक पोलिसानेच एका तक्रारकर्त्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे. विकृत माणसांची फौज नाक्यानाक्यांवर, बस स्टँडवर, रेल्वेस्थानकांवर, प्रवासात, नातेवाइकांच्या गराड्यात, अनेक कार्यालयांत छुप्या पद्धतीने तैनात आहे, अशा नराधमांपासून मुली, महिलांनी सुरक्षित राहण्याकरिता अशा विकृत लोकांची मानसिक स्थिती, वागण्यातील बदल ओळखला पाहिजे. मुलींना तशा प्रकारचे प्रशिक्षण लहानपणापासून देणे गरजेचे आहे. व्यक्तीच्या वागण्यातील बदल, त्याची मनोवस्था याचा मनोकायिक अभ्यास अर्थात् मानसशास्त्र विषय त्या दृष्टीने अभ्यासात आणणे गरजेचे आहे. मानवातील रानटीपणाची कारणे अनेक जुन्या विकृत ग्रंथांत आहेत. कारण मनूस्मृतीसारखे ग्रंथ, ज्यामध्ये सुमती भार्गव नावाच्या मनूने तत्कालीन समाजासाठी इ.स. पूर्व 190 या काळात कायदा म्हणजेच जगण्याची आचारसंहिता व ती न राबवल्यास होणारी शिक्षेची तरतूद यांवर बरेच काही लिहून ठेवले आहे. स्त्रिया व शूद्र यांना समाजात हीन वागणूक द्यावी, त्यांना समाजातील कोणत्याही कार्यक्रमात अथवा कार्यात सहभागी समाजातील सर्व बदलांचा सर्वांनी अभ्यास करावा व येणार्‍या परिस्थितीत पुढील पिढीला या विकृत व चंगळवादाची झळ लागू नये, यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-अशोक सुतार
8600316798