धुळे । स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायद्याची समाजातील आर्थिक दुर्बल घटकासह मागासलेल्या वाड्या वस्त्यांमध्ये परिणामकारक अंमलबजावणी करून स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे. तसेच अंमलबजावणीसाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हास्तरीय दक्षता पथकाच्या मासिक सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी.एन. वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, महानगरपालीकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, डॉ. अरुण मोरे, विधी समुपदेशक अॅड. मीरा माळी आदी उपस्थित होते.
प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे
यावेळी जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून शासनामार्फत सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसह विविध स्तरावर प्रशिक्षण मोहिमा राबविण्यात येत आहेत. तसेच शासनामार्फत गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारीत 2003 ची जिल्ह्यातील सर्व समुचित प्राधिकार्यांच्या मार्फत अंमलबजावणी करण्यात येते. मात्र, याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी समाजातील आर्थिक दुर्बल घटकासह झोपडपट्टी क्षेत्र निश्चित करुन या ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करुन प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी काम करावे, अशा सूचना त्यांनी सर्व समिती सदस्यांना दिल्या. यावेळी स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या सर्व यंत्रणांनी सादर केलेल्या आराखड्याबाबत जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, याबाबत सुक्ष्म नियोजन करून आराखडा तयार करावा. दक्षता पथकामार्फत सोनोग्राफी केंद्राची तपासणी व केलेल्या कारवाईचा अहवाल मासिक सभेच्या पूर्वी दरमहा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.