हिवरा आश्रम : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे करावे, यासाठी निमंत्रक संस्थांत मोठी चुरश निर्माण झाली असतानाच, साहित्य महामंडळाच्या स्थळपाहणी समितीने शुक्रवारी हिवरा आश्रम येथे मुक्कामीच भेट दिली. दिल्लीतील आयोजकांनी स्थळपाहणी समितीच्या स्वागतात कसूर ठेवला होता. त्यांचे यथोचित स्वागतच न झाल्याने समितीतील सदस्य नाराज झाले होते. त्यामुळे दिल्लीबाबत समिती सदस्य प्रतिकूल मनस्थितीत आले होते. तर हिवरा आश्रम येथे या समिती सदस्यांचे जल्लोषात स्वागत झाले. ढोल, लेझिम पथकांच्या निनादात आणि कुमारिकांच्या ओवाळणीने सदस्यांचे स्वागत करत आयोजनउत्सुक विवेकानंद आश्रमाने पाहुण्यांची चांगलीच सरबराई केली. यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी विवेकानंद ज्ञानसंकुलाच्या शिक्षक, प्राध्यापकांचा स्वतंत्र तासच घेऊन त्यांना भाषा, साहित्य आणि कला याबाबत प्रबोधनही केले.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 91 व्या साहित्य संमेलनासाठी देशभरातून सहा निमंत्रणे आली होती. त्यापैकी तीन निमंत्रणे पहिल्याच फेरीत बाद झाली होती. तर राजधानी नवी दिल्ली, बडोदा आणि हिवरा आश्रम या तीनच संस्थांत चुरश निर्माण झाली होती. साहित्य महामंडळाच्या स्थळपाहणी समितीने यापूर्वी दिल्ली व बडोदा या दोन स्थळांची पाहणी केली होती. तथापि, हिवरा आश्रमची पाहणी बाकी होती. त्यानुसार साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, श्री भाले, पद्माकर कुळकर्णींसह अन्य दोन सदस्यांनी शुक्रवारी विवेकानंद आश्रमात मुक्कामी हजेरी लावली. या समितीचे विवेकानंद आश्रमाच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. विवेकानंद विद्या मंदिराच्या लेझिम पथकासह ढोल-ताशांच्या निनादात समिती सदस्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते यांच्यासह सर्व पदाधिकारी व शैक्षणिक संकुलातील प्राचार्यवर्गाने स्वागत केले. यानिमित्त विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात ज्ञानसंकुलातील शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी श्रीपाद जोशी यांनी छोटेखानी प्रबोधनवर्गदेखील घेतला. मराठी भाषा, तिची वैशिष्ट्ये, कला आणि साहित्य या विषयावर त्यांनी प्रबोधन केले. ही स्थळ पाहणी समिती विवेकानंद आश्रमात मुक्कामी थांबली असून, ते साहित्य रसिकांसाठी येथे उपलब्ध असलेल्या व उपलब्ध करता येऊ शकणार्या सोयीसुविधांची माहिती घेऊन पाहणीही करणार आहेत.
दरम्यान, या समिती सदस्यांना विवेकानंद आश्रमाचा परिसरही पदाधिकार्यांनी दाखविला. हरिहरतीर्थ, विवेकानंद आश्रम ज्ञानसंकुल, विवेकानंद स्मारक या परिसराची पाहणी करून निवड समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले. रविवारी साहित्य महामंडळाची नागपुरात बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे समिती सदस्यांची विवेकानंद आश्रमाची स्थळपाहणी महत्वपूर्ण ठरणार आहे.