मुंबई । विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक लढविणार्या सहा सदस्यांचा कालावधी यंदा जून, जुलैअखेर संपुष्टात येत आहे. या रिक्त सहा जागांसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी घोषित केले. यासाठी 21 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 24 मे रोजी होणार आहे. रिक्त होत असलेल्या या सहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संबधित क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण 78 जागा आहेत. यात राष्ट्रवादीचे 23 सदस्य, काँग्रेसचे 19, भाजप 18, शिवसेना 9, अपक्ष 5, शेकाप 2, पीआरपी आणि लोकभारती प्रत्येकी 1 असे पक्षीय बलाबल आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे, परभणी पदवीधरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल्ला खान दुर्राणी, अमरावती स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे मंत्री प्रवीण पोटे पाटील, भाजपचे वर्ध्यातून निवडून आलेले मितेश भांगडिया, नाशिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले राष्ट्रवादीचे जयंतराव जाधव, लातूरचे काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख यांच्या जागेवर ही निवडणूक होत आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.