‘स्थायी’च्या सभापतीपदी कैलास चौधरी

0

धुळे । महानगर पालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीसाठी मतदान घ्यावे लागले. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली आणि स्थायी समितीत निर्णायकी संख्याबळ असले तरी भाजपच्या उमेदवाराने आव्हान दिल्याने मतदान पध्दतीने सभापतींची निवड करावी लागली. अपेक्षे प्रमाणे राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांना 13 तर भाजपच्या बालीबेन मंडोरे यांना 3 मते पडली. मनपा सभागृहात स्थायी समिती सभापती निवडीसाठी जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली. आयुक्त संगीता धायगुडे, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी जयसिंग वळवी, नगरसचिव मनोज वाघ यांचेसह संबंधीत अधिकार्‍यांच्या उपस्थीतीत सभापती पदासाठी नामांकन भरलेल्या उमेदवारांना माघारीची संधी देण्यात आली.

कैलास चौधरींद्वारा मायादेवींचे चरणस्पर्श!
कैलास चौधरी यांच्या सभापती पदासाठी मतदान करताच मायादेवी परदेशी यांनी सभागृह सोडण्यासाठी पिठासीन अधिकार्‍यांची परवानगी मागितली. मात्र, त्यांना निकाल जाहीर होईपर्यंत थांबण्यास सांगण्यात आले. त्यानंतर निकाल जाहीर होताच कैलास चौधरी यांनी सर्व प्रथम मायादेवी परदेशी यांचे सभागृहात चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेतले. यातूनही त्याच या पदाच्या दावेदार होत्या. हे अधोरेखित झाले.

मायादेवींनी ’ऑफर’ नाकारली!
सभापती पदाच्या स्पर्धेतून मायादेवी परदेशी यांचे नाव मागे पडताच त्यांच्या नाराजीची चर्चा झाली. या नाराजीचा फायदा उठवून काही विरोधी पक्षांनी मायादेवींना आपल्या पक्षात घेण्यासाठी फिल्डींग लावली होती. त्यांना काही ’थैल्यां’चे आमिष दाखवून बंडखोरी करावी, असा आग्रह विरोधी पक्षातील काही प्रमुख पदाधिकार्‍यांनी धरला होता. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मायादेवी परदेशी यांनी ही ऑफर नाकारुन ’वेट अ‍ॅण्ड वॉच’ ही भूमिका घेतली.

महिला बालकल्याण समिती बिनविरोध
महानगर पालिकेतील महिला बालकल्याण समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड दुपारी जाहीर करण्यात आली. 11 सदस्य असलेल्या या समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने ही निवड बिनविरोध झाली. यात इंदुबाई प्रकाश वाघ यांची सभापती पदी तर चंद्रकला माणिक जाधव यांची उपसभापती म्हणून निवड झाली.

समर्थकांचा जल्लोष
निर्धारीत वेळेत कोणीही माघार न घेतल्याने अखेरीस हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांना 13 मतं पडलीत. यात राष्ट्रवादीसह शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी चौधरी यांना मतदान केले. तर प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार बालीबेन मंडोरे यांना स्वतःचे व शिवसेनेचे संजय गुजराथी तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे मिळून 3 मते पडलीत. यावेळी स्थायी समितीचे सदस्य इस्माईल पठाण, साबीर सय्यद मोतेबर, ललीता आघाव, कमलेश देवरे, यमुनाबाई जाधव, दिपक शेलार, गुलाब महाजन, जुलेहा बानो, शेख हाजराबी मोहंमद आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते. कैलास चौधरी यांची सभापतीपदी निवड जाहीर होताच मनपा प्रवेशद्वाराबाहेर समर्थकांनी डिजेसह ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. उघड्या जीपमधून कैलास चौधरी यांची मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हानेते राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर जयश्री अहिरराव, महापौर कल्पना महाले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.