स्थायी समितीत सात कोटींची वर्गीकरणे मंजूर

0

पुणे : महापालिकेच्या अर्थसंकल्पातील योजनांच्या अमंलबजावणीवर भर असल्याने वर्गीकरणे मंजूर करणार नसल्याची भूमिका स्थायी समितीच्या अध्यक्षांनी घेतली खरी मात्र, सुमारे सात कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याबाबतचे ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आले. त्यामुळे या पुढील काळात वर्गीकरणाचे ठराव वाढण्याची शक्यता आहे. परंतु, ही वर्गीकरणे सहयादीतून केल्याचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या (2017-18) मंजुरीनंतर काही दिवसांतच प्रभागांमधील कामांकरिता वर्गीकरणाद्वारे निधी देण्याबाबतचे ठराव स्थायी समितीकडे आले होते. एवढ्या लवकर त्याला मंजूर देणार नसल्याची भूमिका अध्यक्षांनी घेतली. सर्वपक्षीय सदस्यांचे ठराव आल्यानंतरही भूमिका कायम ठेवली होती. वर्गीकरणे मंजूर व्हावीत, याकरिता त्या त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दबावतंत्राचाही वापर केला होता. परंतु, अर्थसंकल्पाची मोडतोड करणार नसल्याचे सांगत, एकही ठराव मंजूर केला जाणार नाही, या भूमिकेवर मोहोळ ठाम राहिले होते.

मोहोळ म्हणाले, पहिल्या दोन महिन्यात वर्गीकरणाचा एकही ठराव मंजूर केला नाही. मात्र, आता ते मंजूर करण्यात आले आहे. परंतु, सहयादीतून कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. सहयादीत नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश असतो. त्यामुळे त्यांच्याच प्रभागातील निधी अन्य कामांसाठी दिला आहे. त्यामुळे मूळ अर्थसंकल्पाला धक्का लागणार आहे. त्यातील एक नवा पैसा वर्गीकरणाद्वारे देणार नाही. सहयादीतून सहा ते सात कोटी रुपये देण्याचा झाला आहे. काही आवश्यक त्या कामांसाठी निधी देण्याचा प्रयत्न राहील. परंतु, कोणाच्याही दबावामुळे वर्गीकरणाचे ठराव मंजूर करण्यात आलेले नाहीत.