आठ सदस्यांची 28 फेब्रुवारीअखेर संपणार मुदत
20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत भाजप 11 सदस्यांचे घेणार राजीनामे?
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या तिजोरीच्या चावी असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस लागणार आहे. समितीच्या आठ सदस्यांची 28 फेब्रुवारीला मुदत संपणार आहे. त्यामुळे समितीत जाण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 20 फेब्रुवारीच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी मागीलवर्षी समितीतील दहा आणि अपक्ष एक अशा 11 सदस्यांचे राजीनामे घेतले होते. त्यामुळे यावेळी देखील सर्वच सदस्यांचे राजीनामे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.
असे आहे संख्याबळ
महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. यातील गतवर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीला संपणार आहे.
गेल्या वर्षी यांची निवड
पहिल्या वर्षी चिठ्ठीद्वारे स्थायी समितीतून सदस्य बाहेर पडतात. चिठ्ठीतून बाहेर पडलेल्या सदस्यांची जागी भाजपने शीतल शिंदे, सागर आंगोळकर, ममता गायकवाड, राहुल जाधव, नम्रता लोंढे, विलास मडिगेरी यांची निवड केली होती. दरम्यान, शीतल शिंदे आणि राहुल जाधव यांनी स्थायी सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते. त्यांच्याजागी राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांची निवड केली होती.
यांचा संपला कार्यकाळ
हे देखील वाचा
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक झाल्यानंतर चिठ्ठीतून वाचलेल्या लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, अपक्ष कैलास बारणे, निर्मला कुटे यांचे भाजपने राजीनामे घेतले. त्यांच्या जागी सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस आणि अपक्ष साधना मळेकर यांची स्थायीत नियुक्ती केली होती. राजीनामा दिलेल्या सदस्यांची जागी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा उर्वरित एक वर्षाचा कालावधीच या सदस्यांना नियमाप्रमाणे मिळतो. त्यामुळे त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीला संपत आहे.
भाजप घेणार सर्वाचेच राजीनामे
तर, चिठ्ठीतून बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी स्थायीत नियुक्ती झालेल्या भाजपच्या सागर आंगोळकर, ममता गायकवाड, नम्रता लोंढे, विलास मडिगेरी यांच्यासह राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांचा आणखी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे. परंतु, सत्ताधारी भाजपच्या ठरलेल्या धोरणानुसार यावेळी देखील सर्वच स्थायीच्या 11 सदस्यांचे राजीनामे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.
निवडीत साधावा लागणार समतोल
सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारीच्या महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आगामी काळ निवडणुकीचा असल्याने भाजपकडून स्थायी समितीत सदस्य निवडताना गटा-तटाचा समतोल कसा साधला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, गतवर्षी स्थायी समितीच्या सदस्यांनी ‘ना’राजीनामा सत्र सुरु केले होते. शीतल शिंदे, राहुल जाधव यांनी स्थायी सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते.
राष्ट्रवादीचे दोन, सेनेचा एक असेल समितीत
भाजपच्या धोरणानुसार यावेळी देखील समितीतील दहा आणि अपक्ष एक अशा 11 सदस्यांचे राजीनामे राजीनामे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. भाजप सर्वच सदस्यांचे राजीनामे घेऊ शकतो. त्यामुळे स्थायी समितीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये चुरस निर्माण होणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची स्थायीत वर्णी लागणार आहे.
निवडीसाठी नेत्यांच्या घरी मुक्काम
भाजपने सर्वच नगरसेवकांचे राजीनामे घेतल्यास जुन्या समितीतील राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खानोलकर आणि गीता मंचरकर या दोघीच समितीत कायम राहतील. उर्वरित 14 सदस्य नवीन येण्याची शक्यता आहे. स्थायी समिती ‘एम’ व्हिटॅमिन देणारी समिती मानली जाते. त्यामुळे या समितीत आपली वर्णी लागावी यासाठी नगरसेवक तीव्र इच्छुक असून नेत्यांकडे आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.