स्नेहजा रूपवते यांच्यावर खिरोद्यात अंत्यसंस्कार

0

फैजपूर- विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या ज्येष्ठ कन्या व माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या स्नुषा तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्नेहजा प्रेमानंद रुपवते उर्फ सुलूताई यांच्यावर खिरोदा येथे मंगळवारी शोकाकुल वातावरणात बौद्ध धर्माच्या रीवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. स्नेहजा रुपवते यांच्या कन्या बंधमुक्ता खान व उत्कर्षा सालीयान यांनी अग्निडाग दिला.

अपघातात ओढवला दुर्दैवी मृत्यू
स्नेहजा रुपवते या माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कन्या तथा भाची यज्ञाच्या लग्नसमारंभासाठी खिरोदा येथे आल्या होत्या. 11 रोजी लग्नकार्य आटोपल्यानंतर 12 रोजी त्या मुंबईकडे आपल्या कुटुंबासह निघाल्या असतानाच पाळधी गावाजवळ झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवार, 14 रोजी खिरोदा येथे स्नेहजा रुपवते यांच्यावर बौद्ध धर्म रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे येथील बौद्ध महासभेचे अध्यक्ष के.डी.मोटघरे व बौद्धाचार्य बी.डी.महाले, राजेंद्र अटकाळे यांनी सामूहिक बुद्धवंदना म्हणत अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले.

यांनी व्यक्त केल्या सद्भावना
यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी खासदार डॉ.उल्हासराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, रीपाईचे विजय वाकचौरे, आमदार डॉ.सुधीर तांबे, अकोला येथील अशोक भांगरे, सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा शिंदे, मुक्ताईनगर येथील प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनायकराव देशमुख, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना स्नेहजा या महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये समरस झालेल्या होत्या. त्यांनी दादासाहेब रूपवते व प्रेमानंद रूपवते यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व धर्म समभाव, सामाजिक व सांस्कृतिक चळवळ पुढे चालवली असल्याचा गौरव केला.

यांची होती उपस्थिती
माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, प्रांताधिकारी अजित थोरबोले, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, रावेरचे हरीश गनवाणी, बी.आर.कदम, क्रांतीबाई कोळगे, स्मृतीगंधा गायकवाड, युगप्रभा बल्लळ यांच्यासह जळगावसह नगर जिल्हा व मुंबई येथील स्नेहीजन व मधुस्नेह परीवारातील सदस्य अंत्यविधीप्रसंगी उपस्थित होते.