धुळे। धुळे महानगर पालिकेतील युवा नगरसेवक तथा माजी स्थायीसमिती सभापती सोनल शिंदे यांच्या कल्पकतेतून आणि सततच्या पाठपुराव्यामुळे स्नेहनगरात महानगरपालिकेच्या मालकीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव साकार झाला असून लवकरच तो धुळेकरांच्या सेवेत खुला होणार आहे. सुमारे 30 वर्षांपुर्वी धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच स्टेशनरोड परिसरात असलेल्या स्नेहनगरात तत्कालिन धुळे नगरपालिकेने नागरीकांसाठी एका जलतरण तलाव निर्मितीचा निर्णय घेतला होता. मात्र कालौघात तो मागे पडला. तथापी सात वर्षांपुर्वी या विषयाला पुन्हा चालना मिळाली. सन 2012 मध्ये स्नेहनगरातील हा जलतरण तलाव बिओटी तत्वावर साकारला जावा असा निर्णय महापालिकेने घेतला. नगरसेवक सोनल शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन या कामाला चालना दिल्याने अखेरीस बिओटी तत्वावर हा जलतरण तलाव साकारला गेला.
सभासद होण्यासाठी फी: हा जलतरण तलाव हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून यामुळे युवक-युवतींसह महिला-पुरुषांना पोहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पोहणे हा देखील एक प्रकारचा व्यायामच असल्याने या ठिकाणी भविष्यात राज्य व देशपातळीवरील जलतरणपटू तयार होतील, अशी आशा करायला हरकत नाही. पोहण्याचे शौकिन असलेल्या नागरीकांकडून तीमाही, सहामाही व वार्षिक फि घेवून पोहण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 20 बाय50 फूट अशी या तलावाची लांबी,रुंदी असून या तलावाच्या निर्मितीसाठी अडीच कोटी रुपये खर्च आला आहे. स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्रपणे वापरता येणार आहे. तर प्रशिक्षणासाठी दोन पुरुष व एक महिला प्रशिक्षक नियुक्त केला जाणार आहे. याशिवाय सुरक्षेसाठी 6 लाईफगार्ड ठेवण्यात आले आहे. 30 वर्षे हा तलाव ठेकेदार बिओटी तत्वावर वापरणार असून त्यानंतर तो महापालिकेकडे वर्ग केला जाणार आहे.