स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे लघूपटासह दोन माहितीपटांचे प्रदर्शन

0

भुसावळात ‘नली’ या एकल नाट्याला रसिकांनी दिली दाद

भुसावळ- शहरातील चक्रधर नगरातील रोटरी भवनात स्नेहयात्री प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ भुसावळ, तर्फे लघुपट, दोन माहितीपट आणि एकल नाट्यप्रयोगाचे रविवारी सायंकाळी सादरीकरण करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.प्रदीप दवे, राजेश अग्रवाल यांनी गणेश प्रतिमेचे पूजन केल्यानंतर कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सुरुवातीला ‘कंदील‘ हा लघूपट, ‘कलर्स ऑफ इंडिया‘ आणि ‘इन द सर्च ऑफ इक्वॅलिटी’ या दोन माहितीपटांचे सादरीकरण झाले. संपुर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण रीरवारातील वृध्दांची समस्या ‘कंदील‘ या लघूपटाव्दारे मांडण्यात आली. विविध धर्मातल्या देवी-देवतांची नावे, आदर्श पुरुषांची मानचित्रे आणि घोषवाक्य यातलं वैविध्य दाखवत जाती-पातीत विभागल्या गेलेल्या समाजमनाचं जळजळीत वास्तव सांगणारा ‘कलर्स ऑफ इंडिया‘ हा माहितीपट रसिकांना अंतर्मुख करून गेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेली ‘ सामाजिक समता’ स्वातंत्र्यानंतर तळागाळात कितपत रुजली आहे याचा शोध घेणारा‘इन द सर्च ऑफ इक्वॅटी’ हा माहितीपट रसिकांना एक वेगळा विचार देऊन गेला.

एकल नाट्यप्रयोगाला रसिकांची दाद
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘पडझड वार्‍याच्या भिंती’ या पुस्तकातील ‘नलिनी देवराय’ या व्यक्तीचित्रावर आधारित एकल नाट्यप्रयोग ‘नली’ चे सादरीकरण करण्यात आले. ‘नली’ या ग्रामीण भागातील उपेक्षीत स्त्रीचं व्यक्तीचित्रण हर्षल पाटील यांनी आपल्या कायीक आणि वाचिक अभिनयातून सक्षक्तपणे उभं केलं. बाळ्या आणि नलीच्या अव्यक्त प्रेमाचे एकेक पदर हळुवारपणे उलगडत हर्षल पाटील यांनी आपल्या अभिनयातून आणि संवादातून अगदी शेवटापर्यंत हे नाट्य प्रभावी ठेवलं. एकंदरीत हर्षल पाटील यांच्या कसदार अभिनयाने आणि योगेश पाटील यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यातून साकारलेली ‘नली’ भुसावळकरांच्या दिर्घकाळ स्मरणात राहील. संजीवनी यावलकर यांनी सूत्रसंचलन तर मानसी पाटील हिने आभार प्रदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा.गिरीष कुळकर्णी, विश्‍वजीत घुले, नारायण माळी, तुषार जोशी, आदर्श पांड्या, धनराज कुंवर, खुशाल निंबाळे, हरीष कोळी, रोशनी परदेशी, अक्षय परदेशी यांनी परीश्रम घेतले.