तळेगाव : अनाथ दुःखितांचे दु:ख दूर करून त्यांच्या जीवनात सुखाची प्रकाशज्योत देण्याच्या उद्देशाने ‘स्नेहराज’ फाऊंडेशनची स्थापना दसर्याच्या मुहुर्तावर वडगाव मावळ येथे करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे नेते वसंत वाणी आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा संतोषी शिळीमकर, माजी पंचायत समिती सदस्य शांताराम काजळे, महेश शिळीमकर, ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका पूजा वहिले, शारदा ढोरे, पूनम जाधव, माजी उपसरपंच विशाल वहिले, ॠतीजा शिळीमकर, आशा डुंबरे, माया येवले, मृदुला काजळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपावी
संतोषी शिळीमकर यांनी सांगितले की, समाजामध्ये दुर्लक्षित घटक मोठ्या प्रमाणात आहेत. आपण आपल्य परीने त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. कुणाला जेवण मिळत नसते, तर कुणाला कपडे. मग त्यांना ते मिळवून देणे हे पण तितकेच महत्वाचे असते. अनाथ, दुर्बल घटकांसाठी काम करण्यासाठीच या फाऊंडेशनची स्थापना केली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी यथाशक्ती सहकार्य करण्याची गरज आहे. यावेळी अहिरवडेतील किनारा वृद्धाश्रम व आंदर मावळातील कुसवलीच्या शंकरवाडीतील कातकरी बांधवांना मिठाई आणि ब्लॅकेटचे वाटपही करण्यात आले. अहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रमात अॅड.प्रीती वैद्य सुमारे शंभर आजोबा, आजींचा सांभाळ करीत आहेत. ज्या वृद्ध आई-वडिलांची मुले त्यांचे संगोपन करीत नाहीत, अशा आजी-आजोबांना मायेचे पांघरूण या निमित्ताने देण्यात आले. तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. या फाऊंडेशनच्यावतीने आगामी काळात लायब्ररी, माफक दरात विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संतोष शिळीमकर यांनी प्रास्ताविक केले. सिद्धेश्वर ढोरे यांनी सूत्रसंचालन केले . बाबासाहेब काजळे यांनी आभार मानले.