स्नेहवनच्या मुलांबरोबर साजरा केला पितृदिन

0

रोझलँण्ड सोसायटीने राबविला उपक्रम

सांगवी : पितृदिनाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील रोझलँण्ड सोसायटीच्यावतीने सायकल दान हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भोसरी येथील ‘स्नेहवन’ या संस्थेतील मुलांना जुन्या परंतु वापरात असलेल्या पंधरा सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी दुसरी ते दहावी या इयत्तेत शिकणारी पंचवीस मुलांना खाऊवाटपही करण्यात आले. तसेच या मुलांनी सोसायटीच्या बागेत खेळण्याचा आनंदही लुटला. स्नेहवन ही दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांबरोबर शेतमजूर व ऊसतोड कामगारांच्या मुलांचा सांभाळ करणारी संस्था आहे. अशा रंजल्या गांजल्या मुलांबरोबर रोझलँण्डच्या सभासदांनी पितृ दिन साजरा केला.

जुन्या सायकली झाल्या जमा
सोसायटीचे चेअरमन संतोष म्हसकर यांनी सोसायटीतील सभासदांना लहान मुलांच्या जुन्या सायकली दान करण्याचे आवाहन केले होते. सभासदांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पंधरा सायकली जमा केल्या व संस्थेचे विश्‍वस्त अशोक देशमाने यांच्याकडे स्वाधीन केल्या. यावेळी नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनीही रूपये अकरा हजारांचा चेक स्नेहवन करीता दिला. स्वतः म्हसकर व व्ही. राममुर्ती यांनी पाच पाच हजार तर रमाकांत वाघुळदे यांनी अडिच हजार व इतरांचे असे एकूण पंचवीस हजार यावेळी स्नेहवनला देण्यात आले.