वंचित घटकांतील मुलांना मुख्य प्रवाहात आणायचा आटोकाट प्रयत्न करणारे आणि वंचितांसाठीच काम करायचं ध्येय ठेवलेले महेश निंबाळकर. चाळिशीतील तरुण. माझ्यासारखे अनेक लोकं या मार्गावरून रोज प्रवास करत आहेत. लातूरकडून बार्शीत एन्ट्री मारल्यावर झाडबुके महाविद्यालयाच्या समोर वर्षभर मूर्ती तयार करणारे, लाकडी सामान तयार करणारे वंचित लोकं आपापल्या कामात दिवसभर बिझी असतात. निर्वासितांसारखी निवार्यााचा कुठलाही भरवसा नसलेली ही माणसं माझ्या गावाजवळ राहून भारतात राहतात की नाहीत, याचा काहीच पुरावा त्यांच्याकडे नाही. आम्हीही बसमधून या लोकांकडे दुरूनच पाहिलेलं. बार्शीला गेल्यावर महेशदादा या ताडपत्रीचे समृद्ध छत असलेल्या कलेच्या अनोख्या दुनियेत प्रत्यक्षात घेऊन गेले. ज्यांच्या जगण्याला कुठलाही भाव नाही त्यांच्याशी मूतीर्र्ंचा भाव करताना अनेक लोकं तिथं येऊन जातात. महेशदादा सोबत असल्यामुळे त्या लोकांनी अगदीच आदराने आम्हाला बसण्याची विनंती केली. नेहमीच भीती घेऊन जगणारे हे लोकं दादांशी बोलताना निर्धास्त वाटत होती. असं काय केलं असेल या माणसाने की हे लोकं एवढं मानतात यांना? हा सवाल माझ्या मनात घोळत राहिला. याचं उत्तर तिथल्या एका माणसाने दिलं. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणजे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि नागरी सुविधांसाठी उपयोगी कागदपत्रांसाठी महेशदादांनी सिस्टमला विनवण्या आणि संघर्ष करून माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखवल्याने त्यांच्या डोळ्यात महेशदादांविषयी कृतज्ञता दिसून येत होती.
हे केवळ एकच काम आहे का? तर नाही. अशा विविधांगी कामाचे पुरावे त्यांच्या फेसबुक भिंतीवर आपल्याला बघायला मिळतील. भटक्या समाजातील कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करून त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करणे, त्या मुलांना व्यसनापासून दूर करणे, घरी गणपती न बसवता रस्त्यावरच्या मुलांपैकी एकाला दहा दिवस घरी आणून त्याची सेवा करणे, पुण्यात जाऊन झेड ब्रीजखाली तेथील भटक्या समाजाच्या मुलांसाठी ‘ग्रीन सिग्नल’ नावाची शाळा सुरू करणे, सेक्स वर्कर महिलांना रेशन कार्ड मिळवून देणे, गरीब रुग्णांना आर्थिक आणि सर्व प्रकारची मदत मिळवून देणे यांसारखी अनेक सामाजिक कामे महेशदादांना राज्यभरात ओळख मिळवून देताहेत. व्यक्तीला खरंच गरज आहे का? याची माहिती घेऊन खरोखर गरज आहे हे जाणवल्यास ते सरळ आपल्या ग्रुपवर आणि फेसबुकवर त्या संबंधित व्यक्तीचा अकाउंट नंबर आणि गरजेचे स्वरूप टाकतात. त्या वंचित व्यक्तीचा प्रॉब्लेम संपेपर्यंत ते पाठपुरावा करत राहतात.
घरी गरिबीची स्थिती असल्याने महेशदादांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधाही मिळाल्या नाहीत. अशा स्थितीतही शिक्षणाची आस न सोडता डीएड करून शिक्षकाची नोकरी मिळवली. मात्र, त्यांच्यातील सामाजिक शिक्षक त्यांना शाळेत बसूच देईना. भटक्या मुलांची अवस्था आपल्यापेक्षाही वाईट आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी या उपक्रमांद्वारे पायाबांधणी सुरू केली.
आनंदवनातील विकास आमटे, कौस्तुभ आमटे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी ‘स्नेहग्राम’ स्थापलेय. बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात हे स्नेहाचे अनोखे गाव आहे. तिथं पारधी, कोल्हाटी अशा भटक्या जमातीतील 33 मुलं आज मुख्य प्रवाहात आली आहेत. त्या मुलांच्या घरच्या लोकांची परवानगी घेऊन त्यांना इथे दाखल केलेय. मात्र, त्यांच्याकडे आपल्या अस्तित्वाचा एकही कागदी पुरावा नसल्याने कागदी घोड्यांसाठी धावावे लागले. आज त्यांच्यामुळे त्या मुलांचे वयाचे दाखले, आधार कार्ड यांसारखी कागदपत्रे तयार असून शिक्षणाची बाराखडीदेखील ते गिरवत आहेत. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात भरकटलेली मुलं इथं आहेत. या सगळ्या उपक्रमाचा खर्च भागवताना त्यांना अनेक अडचणी येतात. मात्र, ते डगमगत नाहीत. सोशल मीडियातून किंवा सामाजिक दातृत्वाची भावना असणारी अनेक लोकं त्यांना या अनोख्या उपक्रमासाठी मदत करतात. निश्चितच या अनोख्या संकुलाला कुठल्याही स्वरूपातील मदतीची गरज आहे. अनेक भरकटलेल्या मुलांना स्नेहाच्या या मार्गावर आणणार असल्याचे ते सांगतात. त्यांची पत्नी विनयाताई यासाठी त्यांच्यासोबत खंबीर उभ्या आहेत. या आणि अशा किमान 500 मुलांसाठी तरी भविष्यात दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. भटक्या मुलांसाठी उभारलेलं स्नेहग्राम खरोखर स्नेहाने ओतप्रोत आहे. स्नेहग्रामला नक्की भेट द्या.
(स्नेहग्रामला जाण्यासाठी बार्शीवरून कोरफळे जाण्यासाठी बसची सुविधा आहे. अधिक माहितीसाठी महेश निंबाळकर यांच्याशी 9822897382 वर संपर्क करू शकता.) महेशदादांनी भटक्या जमातीतील मुलांसाठी निवासी ’स्नेहग्राम’ स्थापलेय. बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात हे स्नेहाचे अनोखे गाव आहे. तिथं पारधी, कोल्हाटी अशा भटक्या जमातीतील 33 मुलं आज मुख्य प्रवाहात आली आहेत.
– निलेश झालटे