चर्चा न करू दिल्याने विरोधकांनी केला सभात्याग
मुंबई:– राज्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांवर बोगस भरतीमुळे अन्याय होत असल्याने राज्यभर असंतोषाचे वातावरण आहे. दरम्यान एमपीएससी परीक्षांमध्ये वाढत्या बोगसगिरीच्या प्रकरणांचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेत बोगस परिक्षार्थी बसवून त्या बदल्यात पैसे घेण्याचे प्रमाण उघडकीस आल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी उपस्थित करत असे रॅकेट चालविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी आणि स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र ही मागणी फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
हे देखील वाचा
डमी रॅकेट सरकारला माहित आहे
एमपीएससी घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विरोधकांनी आक्रमक होत आवाज उठवला. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जयंत पाटील यांनीया मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडत एमपीएससी परीक्षेतील डमी रॅकेट सरकारला माहित आहे. हेसगळे रॅकेट उद्ध्वस्त करायलाहवे. यासाठी सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावर विरोधी पक्ष नेते विखे-पाटील यांनी हे प्रकरण गंभीर आहे. बराच कालावधीपासून हा घोटाळा सुरू आहे. एवढा मोठा घोटाळा आहे, पण सरकार त्याची दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्या जिल्ह्यात विद्यार्थी मोर्चे काढत आहेत, त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याची मागणी करत सरकार नेमके कुणाला पाठिशी घालत आहे असा सवाल केला.
बुद्धीमान मुलांचा कामकाजावरचा विश्वास उडेल
विधिमंडळ नेते अजित पवार यांनी यावेळी मुले मर-मर अभ्यास करतात. नको ती ढ आहेत ती दुसऱ्यांना परीक्षेला बसवतात आणि पास होतात, असा आरोप त्यांनी केला. राज्याच्या प्रशासनात हे बोगस लोक कामाला लागलेत त्यांना कमी केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. हे असेच होत राहिले तर बुद्धीमान मुलांचा कामकाजावरचा विश्वासच उडेल असेही ते म्हणाले. त्यातून ते नाउमेद होतील आणि असंतोष निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. बोगस लोक क्लासवन अधिकारी झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. जयंत पाटील यांनी २०० पेक्षा जास्त डमी उमेदवार आहेत. एक हजार पेक्षा जास्त मुलं बोगसरित्या शासकीय सेवेत भरती झाली असल्याचा आरोप करत या गंभीर विषयावर चारचा व्हावी अशी मागणी केली. यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळत हा विषय चर्चेचा होवू शकत नसल्याचे सांगितले. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.