स्पर्धा प्रमुखांकडून मनमानी कारभार

0

येरवडा । शालेय क्रीडा स्पर्धेतही स्पर्धा प्रमुखांकडून मनमानी कारभार होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येत असून याबाबत शिक्षण मंडळ अधिकार्‍यांना निवेदन देऊन याबाबत जाब विचारणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांचे पालक इलियास शेख यांनी दिली.

सध्या खराडी येथील भिकूजी पठारे विद्यालयातील स्टेडियममध्ये तायक्वांदो स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शेख यांचे अमीन, अफताब ही दोन्ही मुले जे.एन. पेटीट या विद्यालयात इयत्ता 8वी व 6वी इयत्तेत शिक्षण घेत असून त्यांनी खराडी येथील जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या तायक्वांदो स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र प्रशिक्षकांनी स्पर्धेदरम्यान दोन्ही खेळाडूंना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना बाद ठरवले. विशेष म्हणजे दोघे ही विजयी असताना त्यांनी स्पर्धकांना बाद कसे ठरवले याबाबत शेख यांनी प्रशिक्षकांना जाब विचारला असता प्रशिक्षक प्रवीण बोरसे व तुंगा यांनी शेख यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन आपण व्हिडीओस मानत नसून हाताने लिहिलेल्या कागदाचा विचार करूनच निर्णय देत असल्याचे उत्तर मिळाले. विशेष म्हणजे शेख यांच्या दोन्ही मुलांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेक विजेतेपद मिळविले असताना देखील अशा प्रकारे स्पर्धकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे शेख यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून स्पर्धकांचे यामुळे मन खच्ची होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे माझ्या मुलांच्या खेळावर देखील याचा परिणाम होणार असल्यामुळे मुलांना न्याय मिळावा याकरिता शिक्षण मंडळ अधिकारी यांना संबंधित घटनेबाबत निवेदन देऊन जाब विचारणार असून यासंदर्भात कोर्टात जाण्याचा इशारा शेख यांनी दिला आहे.